चेन्नई – आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पहाटेच्या सुमारास जया टीव्हीसह बेंगळुरूच्या परप्पना अग्रहारा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला आणि टी.टी.व्ही. दिनकरन यांच्याशी संबंधित इतर मालमत्तांवर छापे टाकले. छाप्यांमुळे एकच खळबळ उडाली असून ही कारवाई सुडबुध्दीने करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील आयकर विभागाच्या अनेक पथकांच्या मदतीने एकाचवेळी एक्कातुथांगल येथील जया टीव्ही कार्यालयासह शशिकला आणि दिनकरन यांच्याशी संबंधित मलमत्तांवर छापे टाकले आहेत. जया टीव्हीच्या कार्यालयामध्ये १० सदस्यीय पथकाने कागदपत्रांची तपासणी केली, तर सहा सदस्यांच्या पथकाने डॉ. नामधू एमजीआर यांच्या तमिळ दैनिकाच्या कार्यालयावर छापा टाकला.
दिवंगत मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांच्या नावाचा जया टीव्ही आणि डॉ. नामधु एमजीआर दैनिक वर्तमानपत्र सध्या शशिकलांच्या कुटुंबियांच्या ताब्यात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक गटाने शशिकलांच्या कुटुंबियांच्या ताब्यातील जया टीव्ही आणि डॉ. नामधू एमजीआर परत मिळवण्याची शपथ घेतलेली आहे. ही संपत्ती पक्षाची असल्याची त्यांची भूमिका आहे. जया टीव्हीचे व्यवस्थापक आणि शशिकला यांच्या भावाचा मुलगा विवेक जयरामन हा सत्ताधारी गट माध्यमांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहे. जया टीव्ही ही एक खाजगी मालमत्ता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर दिनकरन यांनी लोक काय घडत आहे ते सर्व बघत असून जर केंद्राला असे वाटत असेल की, अशा छाप्यांनी ते आम्हाला संपवू शकतील तर ते दिवस स्वप्न बघत असल्याचे म्हटले आहे.