Thursday, September 12, 2024
Homeदेशगुजरातच्या प्रचारात माजी पतंप्रधान मनमोहन सिंग उतरणार!

गुजरातच्या प्रचारात माजी पतंप्रधान मनमोहन सिंग उतरणार!

अहमदाबाद: सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. यासाठी भाजपने प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते मैदानात उतरवले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात नोटाबंदी आणि जीएसटीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. यावरून काँग्रेसला सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात काही प्रमाणात यशही मिळाले आहे. त्यामुळे टीकेचा हा मारा आणखीनच तीव्र करण्यासाठी मनमोहन सिंग यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.   ते गुजरातमध्ये एका दिवसासाठी प्रचार करणार आहेत. मनमोहन सिंग हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ असल्याने त्यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवरून केलेल्या टीकेचा परिणाम अधिक होऊ शकतो. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर दोन टक्क्यांनी घसरेल, हे मनमोहन सिंग यांचे भाकीत खरे ठरले होते. मात्र, जागतिक बँकेकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात भारताने व्यवसाय सुलभता निर्देशांकात मोठी झेप घेतल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, विरोधकांनी जमिनीवरील चित्र प्रत्यक्षात वेगळे असल्याची शंका यावेळी उपस्थित केली. यावरून नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे मनमोहन सिंग यांना लक्ष्य केले होते. मी असा पंतप्रधान आहे की, ज्याने अजूनही जागतिक बँकेची इमारतही बघितलेली नाही. मात्र, यापूर्वी जागतिक बँकेत काम केलेले लोक या पदावर होते. हेच लोक आता जागतिक बँकेच्या अहवालाविषयी शंका घेत असल्याची टीका मोदींनी केली होती.

मंगळवारी गुजरातमध्ये प्रचाराला आल्यावर मनमोहन सिंग हे अहमदाबाद येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदही घेणार आहेत. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. तो दिवस काँग्रेस ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करणार आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी मनमोहन सिंग यांचा गुजरात दौरा होणार आहे. त्यामुळे या दौऱ्याचा कितपत परिणामा साधला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments