नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 79 तासांत देवेंद्र फडणवीस सरकार कोसळलं मात्र, भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 79 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा खासदार हेगडे यांनी केला.
हेगडे म्हणाले की, सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचे फडणवीस 79 तासांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर फडणवीसांना राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केलं? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत”
मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांची केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 79 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन हे नाटक केलं आणि 15 तासात त्यांनी केंद्राचा हा निधी परत पाठवला, असा गौप्यस्फोट हेगडे यांनी केला.
भाजपने ही योजना खूप आधीपासून आखली होती. यासाठीच हे ठरवण्यात आलं की त्यासाठी एक नाटक रचावं लागेल. ते सर्व पूर्वनियोजित होतं, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीसांनी 15 तासात 40 हजार कोटी रुपये तिकडे पाठवले, जिथून ते आले होते. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा पैसा वाचवला, असा दावाही हेगडे यांनी केला.
तर या प्रकरणाची चौकशी करू – माणिकराव ठाकरे
खासदार अनंत कुमार हेगडे यांनी जो दावा केला त्यामध्ये सत्यता असेल तर त्याची चौकशी करू. अशी माहिती काँग्रेस नेते आमदार माणिकराव ठाकरे यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.