नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “शरद पवार यांनी युपीएचं अध्यक्षपद भूषवायला हवं”, अशी भूमिका पुन्हा आज मांडली आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्यातल्या सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनलेलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा वाद निर्माण करताना त्याचं भान त्यांनी ठेवणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही”, अशी ऱोखठोक प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी दिली.
हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये समाचार घेतला. ” संजय राऊतांचं हे विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावचट चर्चा करण्याची काय गरज आहे?
स्वत: शरद पवारही असं म्हणणार नाही. काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष आहे. असं असताना त्याचं नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही.
एनसीपी राज्यातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे”, अशी खरमरीत प्रतिक्रिया हुसेन दलवाईंनी दिली आहे.
“शिवसेना युपीएचा घटक नाही. त्यांनी आधी युपीएचा घटक व्हावं आणि…
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील संजय राऊतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “शिवसेना युपीएचा घटक नाही. त्यांनी आधी युपीएचा घटक व्हावं आणि मग त्यांना बोलण्याचा अधिकार असेल. त्यांना सातत्याने काही ना काही लिहावं लागतं. त्यामुळे ते सातत्याने अशा मागण्या करत असतात.
एकदा सांगूनही ते पुन्हा पुन्हा त्यांना सांगावं लागतं. राज्यातली आघाडी एका विशिष्ट परिस्थितीत आहे. वैचारिक भिन्नता असूनही भाजपाचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. युपीए हे राष्ट्रीय दल आहे. त्यामुळे याबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही”, असं सावंत म्हणाले आहेत.