नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस उमेदवारांच्या यादीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्षांची स्वाक्षरी असलेली कोणतीही यादी काँग्रेसने जाहीर केलेली नाही. भाजपनेच खोटेपणा करून संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेस उमेदवारांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने उमेदवारांची यादी सोशल मीडियावर पसरवली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पक्षाच्या आयटी सेलने या यादीची सत्यता पडताळून पाहिली आहे. भाजपच्या वेबसाइटवरून ही बनावट यादी पसरवण्यात आल्याचे काँग्रेस प्रवक्ते मनीष दोषी यांनी सांगितले.
गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनीही ही यादी खोटी असल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची खोटी यादी पसरवण्यात आली आहे. त्यावर माझी बनावट स्वाक्षरी आहे. अशी कोणतीच यादी मी जाहीर केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. उमेदवारांच्या नावाची घोषणा केंद्रीय निवड समितीकडून करण्यात येते. काँग्रेस उमेदवारांची यादी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या दिल्ली मुख्यालयातून प्रसिद्ध केली जाते, असेही सोलंकी यांनी सांगितले.