अॅपलने भारतात आयफोन १२ चं उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. भारतात आयफोन १२ चं उत्पादन सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं कपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
भारतात आयफोनचं उत्पादन घेण्यासाठी अॅपलने फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. भारतात आयफोन एसई, आयफोन १०आर आणि आयफोन ११ यांचं उत्पादन सुरू आहे, आणि आता आयफोन १२ च्या उत्पादनालाही सुरूवात झाली आहे.
“भारतात आयफोन १२ चं उत्पादन सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे” असं कंपनीने आपल्या निवेदनात सांगितलं. पण नेमक्या कोणत्या पुरवठादाराकडून आयफोन १२ चं उत्पादन घेतलं जात आहे याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, फॉक्स्कॉनच्या तामिळनाडूमधील कारखान्यात आयफोन १२ च्या उत्पादनाला सुरूवात झाली असल्याचं समजतंय. तरी फॉक्सकॉनने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
जानेवारी महिन्यातच अॅपलने या तिमाहीत भारतात आयफोन १२ चं उत्पादन सुरू करणार असल्याचं सांगितलं होतं. यामुळे मेक इन इंडिया मोहिमेलाही बळ मिळेल.
भारताला मोबाईल आणि घटकांच्या निर्मितीचे मोठे केंद्र बनवण्याचे आमचे प्रयत्न जगाचं लक्ष वेधून घेत आहेत हे पाहून आनंद झाला. रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.