मुंबई: मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे. असं भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं. यावेळी त्यांनी सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, असं देखील बोलून दाखवलं.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आली आहे. उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता १५ ते २५ मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे.
मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर २०१७ ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं.
१०२ वी घटना दुरूस्ती बाबतीत सविस्तर संवाद व सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा.
लाईव्ह पत्रकार परिषद: https://t.co/w23W4CaX72
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 12, 2021
तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं. पण, सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे.
तर, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील काही दिवसांअगोदर आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं होतं. मागील काही दिवसांपासून आरक्षणासंदर्भात विविध नेत्यांच्या भेटी घेत असलेल्या उदयनराजे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलेला आहे.
“मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरु द्या,” असा गर्भित इशारा मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य प्रवर्तक खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता.