Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशसर्वोच्च न्यायालयात धाव: काँग्रेसने गुजरातमधील २५ टक्के VVPAT मशीनमधील मतांची मोजणीची...

सर्वोच्च न्यायालयात धाव: काँग्रेसने गुजरातमधील २५ टक्के VVPAT मशीनमधील मतांची मोजणीची मागणी

नवी दिल्ली – गुजरातमध्ये भाजपाविरोधात जोरदार वातावरणनिर्मिती केल्यानंतरही काँग्रेलला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळेच निकालाला तीन दिवसांचा अवधी असताना सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मतमोजणी दरम्यान किमान २५ टक्के VVPAT मशीनमधील चिठ्ठ्यांचीही मोजणी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत इव्हीएममध्ये जी मते पडली आहेत त्यांची सत्यता VVPAT मशीनमधील मतांची मोजणी करून तपासण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. या खटल्यात काँग्रेसकडून ज्येष्ट वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी म्हणणे मांडणार आहेत.
गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी संपताच विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) अंदाज आले होते. सर्व एक्झिट पोलमधून गुजरातेत भाजपाच पुन्हा एकवार मोठ्या बहुमताने सत्तेवर येईल, असे एकमत झाले आहे. गुजरातमध्ये सोमवार, १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले होते दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच राज्यामध्ये घेतलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष वृत्तवाहिन्यांनी जाहीर केले. त्यांच्या निष्कर्षात भाजपा व काँग्रेस या दोन पक्षांना मिळू शकणा-या जागांबाबत एकमत नसले, तरी गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता येईल, यावर या सर्वांमध्ये एकवाक्यता आहे. या अंदाजांनंतर काँग्रेसच्या गोटात धाकधुक वाढली आहे.
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असल्याने या निवडणुकीत या दोघांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागली होती. विशेषत: सलग १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी ते पद सोडून पंतप्रधान म्हणून दिल्लीत गेल्यावर त्यांची या राज्यावरील पकड सैल झाली की अधिक बळकट झाली याचा कौल म्हणून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मोदींनीही काहीही झाले तरी गुजरात हातचे जाऊ द्यायचे नाही या पक्क्या इराद्याने पंतप्रधानपदाच्या सर्व जबाबदा-या बाजूला ठेवून प्रचाराचे जातीने नेतृत्व केले. दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा मिळालेले राहुल गांधी यांनीही नव्या दमाने व कल्पकतेने प्रचाराची शिकस्त केली.
सरतेशेवटी दोन्ही बाजूंकडून प्रचाराची पातळी घसरली आणि गुजरातची निवडणूक ही मोदी व राहुल गांधी यांच्यातील व्यक्तिगत लढाई असे चित्र निर्माण झाले. ‘एक्झिट पोल’ हे ब्रह्मवाक्य नाही हे मान्य केले आणि याआधी अनेक एक्झिट पोलचे अंदाज काही वेळा सपशेल चुकलेही आहेत हे गृहीत धरले आणि यंदा आकडे कमी-जास्त झाले तरी त्यातून दिसणारा सत्तेचा अंतिम कौल चुकेल, असे त्यामुळेच वाटत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments