Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशतामिळनाडूत कमल हसन- रजनीकांतची हातमिळवणी?

तामिळनाडूत कमल हसन- रजनीकांतची हातमिळवणी?

नवी दिल्ली तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करणारे रजनीकांत आणि कमल हसन यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तूर्तास मी आणि रजनीकांत यांनी युतीचा निर्णय घेतलेला नाही. पण याचे उत्तर वेळच देऊ शकेल. आपण स्वतंत्र लढू शकतो की धोरणं वेगळी असूनही एकत्र लढता येईल का याचा विचार दोघांनाही करावाच लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया कमल हसनने दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

नववर्षाच्या मुहूर्तावर रजनीकांत यांनी नवीन पक्षाची घोषणा करत तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला. तामिळनाडूच्या राजकारणात तिसरा कोन तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. रजनीकांत यांच्या पाठोपाठ कमल हसन हे देखील राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले आहे. २१ फेब्रुवारी रोजी ते नवीन पक्षाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.

कमल हसन आणि रजनीकांत हे राजकारणाच्या मैदानात भिडण्याची शक्यता असतानाच हसन यांच्या एका विधानाने तर्कवितर्क लढवले जात आहे. आनंदा विकटन या तामिळ मासिकात कमल हसन यांनी राजकारणातील प्रवेश आणि रजनीकांत यांच्याशी युती करणार का याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, रजनीकांत आणि मी युती करणार का असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मी रजनीकांत यांचा सन्मान करतो. पण आधी आम्हाला राजकारणात सक्रीय व्हावे लागेलच. त्यानंतर धोरणं ठरवून ती एकमेकांसाठी पुरक आहे का हे पाहून युतीबाबत निर्णय घेता येईल, असे कमल हसन यांनी सांगितले.

तामिळनाडूत सध्या राजकीय पोकळी निर्माण झाली असून जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकची अवस्था बिकट झाली आहे. एम. करुणानिधी हे अंथरुणाला खिळल्याने डीएमकेची परिस्थिती फारशी चांगली नाही. ही पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न रजनीकांत आणि कमल हसन करत आहेत. यात दोघांना किती यश मिळेल आणि दोघंही एकत्र येतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे रजनीकांत यांनी देखील युतीच्या वृत्ताला नकार दिला नाही. येणाऱ्या काळातच याचे उत्तर मिळेल, असे त्यांनी म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments