Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशइव्हान्का यांची गोवळकोंडा किल्ल्याला भेट!

इव्हान्का यांची गोवळकोंडा किल्ल्याला भेट!

हैदराबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हान्का ट्रम्प या सध्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी भारतात आल्या आहेत. त्यांनी आज येथील प्रसिद्ध ऐतिहासिक गोवळकोंडा किल्ल्याला भेट दिली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची प्रसिद्ध चारमिनारची भेट रद्द करण्यात आली. परिषद आणि शिखर संमेलन हे खरोखरच अभूतपूर्व होते, अशी प्रतिक्रिया यावेळी इव्हान्का यांनी दिली.

३६ वर्षीय इव्हान्का ट्रम्प यांनी आज परिषदेनंतर हैदराबादमधील प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या. यात त्यांनी गोवळकोंडा किल्ल्याला भेट दिली. त्यानंतर ऐतिहासिक चारमिनार आणि हैदराबाद शहरातील प्रसिद्ध लाड बझारलाही (बांगड्यांचा बाजार) त्या भेट देणार होत्या. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची ही भेट रद्द करण्यात आली.

त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावतीने त्यांच्यासाठी किल्ल्याच्या भव्य लॉनमध्ये रात्री डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, इव्हान्का यांच्या कार्यक्रमात अचानक बदल झाल्याने ही पार्टीही रद्द करण्यात आली.

गोवळकोंडा किल्ला १५व्या शतकातील कुतुबशाहीच्या राजवटीत बांधण्यात आला होता. हैदराबादपासून ११ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर इव्हान्का ट्रम्प या हायप्रोफाईल व्हीआयपी व्यक्ती येणार असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

दरम्यान, GES परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी इव्हान्कानं मोदींचं भरभरून कौतुक केलं. मोदी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले प्रयत्न आणि एक सामान्य चहावाला ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. माणसाने ठरवले तर आमूलाग्र बदल घडू शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून समजते असे गौरवोद्गार इव्हान्का ट्रम्प यांनी काढले होते. आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेचे भारतात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते.

 पहिल्यांदाच भारत भेटीवर आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इव्हान्का ट्रम्प यांना खास भेटवस्तू देऊन स्वागत केले. पारंपारिक नक्षीकाम असलेली एक लाकडी पेटी मोदी यांनी इव्हान्का यांना दिली. या परिषदेच्या पहिल्याच दिवशी मोदींनी इव्हान्का  यांच्यासाठी खास मेजवानीही ठेवली होती. जगातल्या सर्वात मोठा डायनिंग हॉल असलेल्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये हैदराबादी पद्धतीची दावत त्यांच्या स्वागतासाठी ठेवण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments