नवी दिल्ली : यूआयडीएआयने २०० पेक्षा जास्त सरकारी वेबसाईटद्वारे आधारी संबंधित माहिती लीक झाल्याचं मान्य केलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत विचारलेल्या प्रश्नावर यूआयडीआयने उत्तर दिलं. ‘द हिंदू’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र, माहिती हे उल्लंघन कधी झालं, याबाबत यूआयडीआयने स्पष्टीकरण दिलेलं नाही.
‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार, यूआयडीएआयने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या १२ अंकी क्रमांकाद्वारे त्याची ओळख, आणि त्याच्या निवासाची माहिती मिळते. सध्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड देणं बंधनकारक करण्यात येत आहे. त्यातच सरकारी वेबसाईटद्वारे आधारवरील माहिती लीक होत असल्याने, आधारच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आरटीआयला दिलेल्या उत्तरात यूआयडीएआयने सांगितलंय की, “अनेक शैक्षणिक संस्थांसह, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागातील एकूण २१० वेबसाईटवरील व्यक्तींची नावं, त्याचे पत्ते आणि इतर माहिती, आधार क्रमांक, सर्वसमान्यांसाठी सार्वजानिक करण्यात आली आहे.” पण यावरील आधारशी संबंधित माहिती तत्काळ हटवण्यात आली असल्याचंही यूआयडीएआयने स्पष्ट केलं.
आरटीआयला दिलेल्या उत्तरात पुढे म्हटलंय की, “यूआयडीएआयची सिस्टिम अशाप्रकारे बनवण्यात आली आहे आहे, ज्याद्वारे व्यक्तीची माहिती सुरक्षित ठेवली जाऊ शकेल. आणि आधार प्रणालीचा हाच महत्त्वाचा भाग आहे. यावरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोरी महत्त्वाच्या उपाययोजना वेळच्या वेळी करण्यात आल्या आहेत.” मात्र, २१० सरकारी वेबसाईटवरुन आरटीआयची माहिती लीक झाल्याने, आधारच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.