नवी दिल्ली:भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धर्माच्या नावाखाली देश तोडणाऱ्या शक्तींविरोधात लढा दिला. धर्मनिरपेक्ष देश कसा निर्माण होईल यावरच त्यांनी भर दिला. देशासाठीचे त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या.
भारत समृद्ध आणि विकसनशील देश कसा होईल याचा ध्यास इंदिरा गांधी यांनी घेतला होता असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचमुळे काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी बोलत होत्या.
इंदिरा गांधी यांच्याशी असलेले नातेही सोनिया गांधी यांनी त्यांच्या भाषणात उलगडले. आम्ही १६ वर्षे सोबत राहिलो, आमच्या छोट्याश्या कुटुंबाच्या त्या प्रमुख होत्या. इंदिरा गांधींना मी कोणतीही आव्हानात्मक परिस्थिती हाताळताना पाहिले आहे. देशाचा विचार हा त्यांचा श्वास होता. गरीब आणि पीडितांची मदत करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी त्यांना मिळालेली शिकवण त्या कधीही विसरल्या नाहीत. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांना अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी ही सगळी आव्हाने लिलया पेलली. युद्ध आणि दहशतवाद यासारख्या गंभीर प्रश्नांनाही त्यांनी समर्थपणे तोंड दिले.
भारतात भूकबळी जाऊ नये म्हणून इंदिरा गांधींनी हरित क्रांतीचा नारा दिला. त्यांनी चालवलेली ही चळवळ देशभरात अत्यंत यशस्वी ठरली असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. रविवारी झालेल्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेते हजर होते. इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ‘अ लाइफ ऑफ करेज’ या पुस्तकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आले. इंदिरा गांधींचे देशासाठीचे योगदान कधीही विसरता येणार नाही असे म्हणत प्रणव मुखर्जी यांनीही इंदिरा गांधींच्या कार्यकाळाबाबत त्यांचे मत मांडले.