नवी दिल्ली: भाजप प्रवेशासाठी १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाजपवर बरसले. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना ‘गुजरात अमूल्य असून ते विकत घेता येऊ शकत नाही,’ असा टोला राहुल गांधी यांनी भाजपला लगावला. ‘गुजरात कधीही विकले जात नव्हते. ते कधीही विकत घेतले जाऊ शकत नाही आणि यापुढेही कोणीही ते विकत घेऊ शकणार नाही,’ असे राहुल यांनी म्हटले.
पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या हार्दिक पटेल यांचे सहकारी नरेंद्र पटेल यांनी रविवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी ५०० रुपयांच्या नोटांची बंडले टेबलवर ठेवली होती. ‘भाजप प्रवेशासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यातील १० लाख रुपये मला अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. भाजप प्रवेशानंतर उर्वरित रक्कम देण्यात येणार असल्याचे आश्वासन मला देण्यात आले. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले वरुण पटेल मला प्रदेशाध्यक्षांकडे घेऊन गेले होते. त्यांनीच मला टोकन रक्कम म्हणून १० लाख रुपये दिले,’ असा सनसनाटी आरोप नरेंद्र पटेल यांनी केला. याच पार्श्वभूमीवर बोलताना, कोणीही गुजरातला विकत घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
Gujarat is priceless. It has never been bought. It can never be bought. It will never be bought.https://t.co/czGCQzrxY4
— Office of RG (@OfficeOfRG) October 23, 2017
‘वरुण पटेल मला गांधीनगरमध्ये घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी मला भाजपच्या कार्यालयात नेले. तिथे प्रदेशाध्यक्ष जितूभाई वघानी आणि काही मंत्री उपस्थित होते. त्यानंतर मला एका खोलीत नेण्यात आले. तिथे १० लाख रुपये असलेली एक बॅग मला देण्यात आली. ही रक्कम टोकन असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी भाजपच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर उर्वरित ९० लाख रुपये देण्यात येतील, असेही मला सांगण्यात आले,’ असे नरेंद्र पटेल यांनी पत्रकारांना सांगितले.
गुजरातमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या गुजरातमधील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर असून ते ओबीसी समाजाच्या महासंमेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी ओबीसी नेते अल्पेश ठाकोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी राहुल गांधी पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजन हार्दिक पटेल यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.