मुंबई: सुजय सोहानी नावाच्या तरूणाने आर्थिक मंदीमुळे २००९ मध्ये आपली नोकरी गमावली. लंडनमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करत होता. नोकरी गेल्यामुळे त्याने नवीन नोकरी शोधण्यापेक्षा लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. वडापाव विकून लंडनमधले दोन भारतीय तरूण कोट्यधीश झाले आहेत.
मुंबईकरांच्या स्ट्रीट फूड यादीत वडापावचं स्थान खूप वेगळं आहे. चविष्ट, पोट भरणारा आणि खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारा वडापाव मुंबईकरांच्या विशेष आवडीचा. हाच वडापाव विकून लंडनमधले दोन भारतीय तरूण कोट्यधीश झाले आहेत. सुजय सोहानी नावाच्या तरूणाने आर्थिक मंदीमुळे २००९ मध्ये आपली नोकरी गमावली. लंडनमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो फूड अँड ब्रेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करायचा. बेरोजगार झाल्यानंतर पोटापाण्याचा प्रश्न त्याच्यासमोर होता. लंडनसारख्या शहरात राहायचं म्हणजे हातात पैसा हवाच, त्यामुळे वेळीच हालचाल केली पाहिजे हा विचार त्याच्या डोक्यात आला. नवीन नोकरी शोधण्यापेक्षा त्याने लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. सुजयने या कामात त्याच्या मित्राची मदत घेतली. व्यवसायाचा विचार त्याने सुबोध जोशीला बोलून दाखवला आणि सुबोधनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. हे दोघंही मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये एकत्र शिकायचे. खाद्यपदार्थाच्या व्यवसायात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र लंडनमध्ये नेमक्या कोणत्या खाद्यपदार्थाची विक्री करायची? असा प्रश्न दोघांसमोर होता. तेव्हा वडापाव विकण्याची कल्पना त्यांना सुचली. ‘हफिंग्टन पोस्ट’ च्या वृत्तानुसार एका आइस्क्रीम पार्लरमध्ये भाड्याने जागा घेऊन सुबोध आणि सुजयने वडापावचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मोफत वडापाव ग्राहकांना देऊन त्यांनी ग्राहकांची मनं जिंकली. हळूहळू उत्पन्न वाढू लागल्यानंतर या दोघांनीही पदार्थांची यादी वाढवत नेली. २०१० मध्ये त्यांनी ‘श्रीकृष्ण वडापाव’ नावाचं भारतीय हॉटेल सुरु केलं.
वडापावसोबतच दाबेली, समोसा, भेळ, कचोरी, भजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस यांसारख्या पदार्थांची देखील विक्री करायला सुरूवात केली. सात वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांना आता या व्यवसायातून वर्षाकाठी ४ कोटींहून अधिक रुपयांचा फायदा होतो.