इस्लामाबाद – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे, की अमेरिकेने पुरावे दिले तर आम्ही त्यांच्यासोबत मिळून हक्कानी नेटवर्क उद्ध्वस्त करु. त्यासाठी अमेरिका-पाकिस्तान संयुक्त कारवाई करेल.
ख्वाजा आसिफ नुकतेच वॉशिंग्टनला गेले होते. तिथे त्यांनी ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आसिफ यांनी एक्स्प्रेस न्यूजसोबत बोलताना सांगितले, ‘आम्ही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना म्हटले आहे की त्यांनी पाकिस्तानात यावे आणि हक्कानी नेटवर्कला मदत केली जात असल्याचे पुरावे द्यावे. जर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना हक्कानी नेटवर्कचे काही पुरावे आढळले तर पाकिस्तानी सैनिक या नेटवर्कविरोधात अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करतील.’
US परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री येणार पाकिस्तानला
– ख्वाजा आसिफ यांनी हे देखील स्पष्ट केले की पाकिस्तानी आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यांनी अशीच ऑफर काबुल दौऱ्या दरम्यान अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनाही दिली होती.
– काही दिवसांपूर्वी अशी माहिती होती, की अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन आणि संरक्षण मंत्री जीम मॅटिस हे याच महिन्यात पाक दौऱ्यावर येणार आहेत.
– ट्रम्प सरकारमधील हे दोन मंत्री दहशतवाद्यांचे नंदनवन असलेल्या पाकिस्तानला कडक संदेश देतील अशी चर्चा आहे.
काय आहे हक्कानी नेटवर्क ?
– हक्कानी नेटवर्क ही एक दहशतवादी संघटना आहे. अफगाणिस्तानात ते अमेरिकेच्या विरोधात काम करतात. या गटाने गेल्या काही वर्षांमध्ये अपहरण, हल्ले अशा अनेक कारवाया केल्या आहेत. या नेटवर्कने अफगाणिस्तानमध्ये भारताविरोधातही कारवाया केल्या होत्या.