Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखएक्झिट पोलची सत्वपरीक्षा?

एक्झिट पोलची सत्वपरीक्षा?

गुजरात निवडणुकीचं मतदान संपलं आणि एक्झिट पोल जाहीर झाले. ज्या पक्षाच्या बाजूने अंदाज आला त्यांनी स्वागत केलंय आणि ज्या पक्षाच्या विरोधात आला त्याने एक्झिट पोलला खोटं ठरवलंय. पण, आजपर्यंतचे एक्झिट पोल पाहिले तर अनेक वेळा एक्झिट पोल चुकले आहे. निवडणूक आणि एक्झिट पोल हे समिकरणचं बनलंय. पण जेव्हा जेव्हा एक्झिट पोल चुकले तेव्हा त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  यापूर्वीचे एक्झिट पोल चुकले आहेत. यामध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होत असल्याचं दिसत होतं, मात्र अंतिम निकाल वेगळाच लागला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा कमी होत असल्याचं दिसत होतं, मात्र प्रत्यक्षात बहुमताने काँग्रेसने सत्ता स्थापन केली. २००७ सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावती यांचा विजय एकाही एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आला नव्हता, मात्र बसपाची सत्ता आली होती. २०१५ मध्ये आपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज एकाही एक्झिट पोलमध्ये दिसला नव्हता. २०१६ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमके आणि काँग्रेस युतीला आघाडी दाखवली होती, मात्र एआयएडीएमके पक्ष सत्तेत आला. याच सर्व एक्झिट पोलच्या आकड्यांचा दाखला देत काँग्रेसने गुजरातच्या एक्झिट पोलला नाकारलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी सर्वांनाच उद्याची सोमवार १८ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. अलीकडेच्या काळात सोशल मीडियावर दररोज कुणी ना कुणी सर्व्हे करत आहे. पण आजपर्यंत या सर्व्हे करणाऱ्यांना कुणी विचारलं नाही. त्यामुळे हे सर्व्हे फक्त सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि टीव्ही चॅनलवर चर्चेसाठीच असतात का ? एक्झिट पोल करणाऱ्या संस्था दावा करतात की, हा लोकांचा कौल आहे. पण खरं पाहिलं तर असे एक्झिट पोल नेहमी चुकीचे ठरले आहे. यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपला ३२४ जागा मिळतील तर कुणी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला ७० पैकी ६७ जागा मिळतील. तर २०१४ मध्ये कुणी असंही म्हटलं की भाजपच्या सुनामीपुढे कुणीही खातं उघडणार नाही. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की,एक्झिट पोल खोटे तर नसतात पण पोल करत असताना सॅम्पल साईज कमी असल्यामुळे संशय निर्माण होतो. कारण काही संस्था या एखाद्या शहरातून फक्त ५००० लोकांना घेऊन सर्व्हे करतात. त्यामुळे हा काही संपूर्ण राज्याचा कौल तर असू शकत नाही. इतर देशातील मतदाराप्रमाणे भारतातला मतदार नाही. त्याला कधी भाजपकडून भीती वाटते तर कधी काँग्रेस, सपा, बसपा,आरजेडीची भीती वाटते त्यामुळे तो खरं कधी बोलत नाही. त्यामुळे एक्झिट पोलचे दावे खोटे ठरतात. तर काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, “सर्व्हे करण्यासाठी जनतेचा मूड जाणून घेण्यासाठी मतदान होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. प्रत्येक आठव्या आणि दहाव्या मतदाराला विचारून आम्ही एक अंदाज तयार करतो. पण कधीकधी असा अंदाज घेणे अवघड होऊन जाते. पण हा अंदाज निकालाच्या आकड्याच्या आसपास तरी येतो. कधी कधी काही संस्था एक-दोन सम विचाराच्या लोकांसारखे ५० जणांचं मत घेतात मग परिणाम काय येईल?” यासाठी जनगणना पाहून सर्व्हे केला पाहिजे. यामध्ये हिंदू, मुस्लिम, शिख, महिला, दलित, ओबीसी, गावं आणि शहरातील प्रत्येक गटातील व्यक्ती यात असले पाहिजे आणि हे राज्याच्या जनगणनेच्या टक्केवारी ठरली पाहिजे. यासाठी सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांची सोशल प्रोफाईल तयार होते. ज्याच्या सर्व्हेमध्ये यासारखी समानात असेल तो सर्व्हे खरा ठरेल. मग भलेही ५० लोकांचा सर्व्हे करा किंवा दोन हजार लोकांचा सर्व्हे करा कौल तोच मिळेल जो जनतेच्या मनात असेल. गुजरात निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदारांनी केलेलं मतदान आणि VVPAT ची चिठ्ठी यात काही फरक तर नाहीये ना याची पडताळणी करण्यासाठी एकूण मतदानाच्या किमान २५ टक्के मतं आणि VVPAT हे समान आहेत की नाही हे तपासण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने  द्यावेत अशी मागणी करणारी गुजरात काँग्रेसनं केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. काँग्रेसच्या याचिकेत काही तथ्य नसल्याचं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. तसंच निवडणूक पद्धतीत काही सुधारणा अपेक्षित असल्यास पक्षानं त्या संदर्भात रिट याचिका दाखल करावी असंही कोर्टाने म्हटलं आहे. ही पडताळणी केल्यास जनतेचा निवडणूक प्रकियेवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल असं काँग्रेसचं म्हणणं होतं. यापूर्वी ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यानुसार मतदारांना चिठ्ठीद्वारे आपण मतदान केलेल्या उमेदवारालाच मत गेलं आहे की नाही याची पडताळणी करता येते. पण त्यावरही आता काँग्रेसनं शंका व्यक्त करत ही याचिका दाखल केली होती. खर काय खोट काय हे उद्या समोर येईलच. तो पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments