Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसंविधानाचे राजकारण धोकादायक!

संविधानाचे राजकारण धोकादायक!

देशात वाचाळ विधान करणाऱ्या नेत्यांची काही कमी नाही. यापैकी एक म्हणजे केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनंत कुमार हेगडे हे एक आहेत. हेगडे यांनी ‘संविधान बदलण्याची भाषा’ केली. त्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असे वादग्रस्त विधान करुन संविधानावर विश्वास नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. देशातील संविधानावरील अविश्वास या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र परिश्रम घेवून जगातील एकमेव संविधान भारताला दिले. पाकिस्तान, अफगाणिस्तानसह बहुतांश देशांनी अनेकदा संविधान बदलले, त्यामुळे तिथे राजकीय उलथापालट होवून धार्मिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक हाणी मोठया प्रचंड प्रमाणात झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे आज देश एकसंघ आहे. अनेक भाषा, धर्म, पंथ, प्रांत, संस्कृतींनी नटलेला भारत देश प्रगतीपथावर आहे. याउलट जर भाजपाचे नेते असे उलटसूलट वक्तव्य करून भारतीय संविधानाच्या गाभ्यामध्ये व लोकशाहीच्या, समतेच्या अंतरंगात विष घालविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विधानानंतर संताप उमटणे साहजिक आहे. एमआयएमचे नेते कलबुर्गी जिल्ह्याचे माजी पंचायत सदस्य गुरुशांत पट्टेदार यांनी हेगडेंची जीभ कापून आणणाऱ्यास आम्ही १ कोटींचे बक्षीस देऊ, अशी घोषणा केली. हेगडे यांच्या विधानाचे पडसाद राज्यसभेतही उमटले.’भारतीय संविधानावरील विश्वास गमावलेल्यांना सरकारमध्ये किंवा संसदेमध्ये राहण्याचा अधिकार नाही’असा प्रश्न राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाब नबी आझाद यांनी उपस्थित केला. खरतर डॉ.बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या दलित संघटनांचे नेते मुग गिळून गप्प बसले आहेत. बाबासाहेबांचे खरे पाईक आम्हीच आहोत असे सांगणारे रामदास आठवले आता मंत्रीपदामुळे गप्प बसले आहेत. आठवले बाबासाहेबांचे नाव घेऊन आपली राजकीय दुकानदारी चालवतात आणि त्यांना भाजपाने मंत्रीपदही दिले आहेत. मंत्रीपदामुळे आठवले हे सरकारच्या विरोधात चकार शब्द ही काढू शकत नाही. शेवटी खुर्ची ही प्रत्येकाला प्यारी असते. फक्त आठवले यांनी हेगडे यांचे विधान चुकीचे निषेधार्ह आहे एवढे प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर करुन दिखाऊपणा केला. इतर दलित नेते स्वत:ला बाबासाहेबांचे पाईक म्हणून घेणारेही गप्प बसले आहेत. हेगडे यांनी जे विधान केले ते देशामध्ये तेढ निर्माण करणारे आहे. संविधानावर त्यांचे विश्वास नाही असेच त्यातून स्पष्ट होते. तरी असे विधान करणाऱ्या मंत्र्यांची हिंमत होतेच कशी. ज्या मंत्र्यांना संविधानावर विश्वास नाही व ते बदलण्याची भाषा करतात याचाच अर्थ हे देशासाठी धोकादायक आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. परंतु वाचाळ नेत्यांनी असे संविधानाबद्दल चुकीचे वादग्रस्त विधान करुन देशाच्या एकता व अखंडतेला धोका पोहचवू नये एवढीच अपेक्षा!

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments