Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख‘गुजरातमधे यंदा काँग्रेसची त्सुनामी!

‘गुजरातमधे यंदा काँग्रेसची त्सुनामी!

गुजरात विधानसभा निवडणूकीत काँग्रेस,भाजपामध्ये काटे की टक्कर होणार आहे. काही माध्यमांनी असा दावा केला परंतु ही निवडणूक भाजपाला जड जात असल्याची खरी परिस्थिती लपवल्या जात आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना आपल्याच होमपीचवर लाज राखण्यासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा असंतोष इतका आहे की, जनतेला विश्वासात घेण्यासाठी भाजपला पंतप्रधानांच्या ५० जाहीर सभा आयोजित कराव्या लागल्या. प्रचारमोहिमेच्या सुरुवातीला भाजपने १८२ मतदारसंघाच्या ५० हजार १२८ बुथवर पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ बरोबर ‘चाय पे चर्चा’ ची मैफल सजवली. अमित शाह, केंद्रातले दोन डझन मंत्री आणि भाजपच्या तमाम नेत्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागले. प्रचाराला संपूर्ण भाजपा,संघाचे नेते आणले तरी सुध्दा गुजराती जनतेचा हवा तसा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला नाही. प्रचारात २२ वर्षात काय केले हे सांगण्यासाठी कोणतेही ठोस कामे मोदी किंवा तेथील राज्य सरकारकडे नसल्यामुळे त्यांनी जनतेचे लक्ष विचलीत केले. मोदींच्या सभांना जी जनता येत होती त्या जनतेनेही पाठ फिरवली. ‘मोदी मोदी’ घोषणा आता बंद झाल्यात. मात्र गुजरातच्या जमिनीवरचे हे सत्य दाखवण्याची हिंमत काही विकाऊ माध्यमांनी दाखवली नाही. भारतीय नागरिक कोणताही धर्म मानत असला तरी देशातील विविध प्रार्थना स्थळांवर जाऊन परमेश्वराचे दर्शन घेण्याचा त्याला अधिकार आहे. भारताच्या विविधतेचे ते एक अलौकिक प्रतीक आहे. पंतप्रधानांसह भाजपला मात्र त्याचा विसर पडलाय. राहुल गांधींनी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेताच, मंदिराच्या कुठल्याशा रजिस्टरचा आधार घेत, राहुल हिंदू नसल्याची हाकाटी भाजपने पिटली. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दाराला म्हणे पंडित नेहरूंचा विरोध होता. मोरवीच्या पूरग्रस्तांची पहाणी करताना पंतप्रधान इंदिरा गांधींनी नाकाला रुमाल लावला होता अशी बाष्कळ उदाहरणे खुद्द पंतप्रधान मोदी जाहीर सभांमधून देत होते. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोध्दारानंतर अथवा मोरवीच्या महापुरानंतर गुजरातच्या जनतेने प्रचंड बहुमताने काँग्रेसच्याच हाती सत्ता सोपवली होती हा इतिहास मोदी विसरले काय? ६० वर्षे काँग्रेसने काय केले हा सवाल वारंवार विचारण्यापेक्षा त्याच ६० वर्षात जनतेने जनसंघ आणि भाजपला का नाकारले? याचे प्रत्यंतर मोदींच्या साडेतीन वर्षाच्या कारकिर्दीतच जनतेला आले आहे. मोदींच्या हातून गुजरात गेले तर दिल्लीत पंतप्रधानपद सांभाळणे देखील त्यांना कठीण जाईल. स्वपक्षातच कदाचित बंडखोरीचे सूर उमटतील, अशी कुजबूज पक्ष कार्यकर्त्यांमधे आत्ताच सुरू झाली आहे. नोटाबंदीनंतर विरोधकांकडे पैसा नाही. भाजपने मात्र गुजरातच्या निवडणुकीत तुफान पैसा ओतला आहे, हे काही लपून राहिलेली नाही. जनतेत मात्र पराकोटीचा असंतोष आहे. लोकसभा २०१४ च्या निवडणुकीनंतर गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. २०१० साली भाजपकडे ३० तर काँग्रेसच्या हाती केवळ १ जिल्हा परिषद होती. मोदी पंतप्रधान झाल्यावर २०१५ साली कोणताही प्रबळ स्थानिक नेता नसताना, काँग्रेसने ४७.८५ टक्के मते मिळवली आणि ३१ पैकी २४ जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा तिरंगा फडकवला. भाजपकडे ३० पैकी अवघ्या ६ जिल्हा परिषदा राहिल्या. नोटाबंदी व जीएसटीच्या अतिरेकी अंमलबजावणीनंतर हा असंतोष शहरांमधेही पोहोचला.  गुजरातचे मतदान ९ आणि १४ डिसेंबरला होणार असून मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक उरले आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रत्यक्ष मतदानाला तीन दिवस उरले आहेत. मतमोजणी १८ डिसेंबरला असून, त्याच दिवशी एका प्रकारे काँग्रेसची त्सुनामी येईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments