Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखआतंकवादी संघटनेने बांगलादेशात घातलाय धुमाकूळ

आतंकवादी संघटनेने बांगलादेशात घातलाय धुमाकूळ

अल-कायदा व आयसीस या दोन दहशतवादी संघटनांनी बांगलादेशात अक्षरशः धुमाकूळ घालत गेल्या वर्षभरात अनेक जणांचे मुडदे पाडले आणि याची थेट जवाबदारी देखील घेतली. उदारमतवादी आणि परदेशी लोकांना त्यांनी केलेले आहे.

शुक्रवारी आयसीसच्या दहशतवाद्यांनी ढाका येथील एका रेस्टॉरंटमध्ये केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले. बळी पडलेल्यांत बहुतेक परदेशी नागरिकांचा समावेश होता.

बांगलादेश सरकारने या हिंसाचारात परदेशी दहशतवादी गटांचा सहभाग असल्याचे नाकारले असले तरी या हल्ल्यामुळे देशाची घडी बिघडली असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे. या देशात आयसीस आणि अल-कायदा या दोन्ही दहशतवादी संघटनांमध्ये दहशतवादी हल्ले चढविण्याची परस्पर स्पर्धा सुरू असून त्या जिहाद अगर धर्मयुद्ध करीत असल्याचा दावा करीत आहेत.

अमेरिकन तपास यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार, अल-कायदाची प्रादेशिक शाखा भारतातील मुस्लिमांना प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करून अचानक हल्ले चढविण्यासाठी चिथावणी देत आहे. अल-कायदाची प्रतिस्पर्धी जिहादी चळवळ इस्लामिक स्टेटने (आयसीसने ) बांग्लादेशात झालेल्या आजपर्यंतच्या या सर्वात जास्त भयंकर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. भारतीय उपखंडातील अल-कायदाने केलेल्या आवाहनानंतर सुरक्षा अधिकारी आणि तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर यां दोन्ही गटांत स्पर्धा सुरू असून दहशतवादी कारवायांत त्या एक दुसर्‍यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे जागतिक पातळीवर जिहाद करण्याचा दावा सुद्धा करीत आहेत.

अल-कायदा प्रमुख असीम उमर याने म्हटले आहे की, भारतीय मुस्लिमांनी युरोपमधील तरुणांकडून प्रेरणा घ्यावी आणि जातीय हिंसाचारासाठी जबाबदार धरत भारतीय पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन उभे करावे.

भारतातील प्रत्येक भागात मुस्लिम आहेत. त्यांनी शतकानुशतके राज्य केलेल्या भारतात परत सत्ता मिळवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी,असेही तो म्हणाला.

1984 साली अल-कायदाची स्थापना झाली, तेव्हां पासून तिच्या दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. मात्र भारतातील 16 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले मुस्लिम अशां कृत्या पासून दूर असून काहीं मोजकेच लोक या संघटनेच्या गळाला लागत असल्याचा निष्कर्ष विविध अहवालावरून लावण्यात येत आहे.

आता प्रश्न असा की, अत्यल्प प्रमाणात का होईना, देशातील मुस्लिम या दहशतवादी संघटनांच्या गळाला का लागत आहेत आणि यामागे कोणती प्रेरणा कार्यरत आहे.

काहींच्या मते यापैकी एक कारण असे की, मुस्लिमांमध्ये देशांतर्गत असुरक्षिततेची भावना अगर बिगर मुस्लिमांच्या प्रति अविश्वासाची भावना असू शकते.

शिवाय काहीं मुस्लिम देश ज्यू ,अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांविरुद्ध टोकाची द्वेष भावना पद्धतशीरपणे निर्माण करीत आहेत.

सर्वच मुस्लिम हे दहशतवादी तर मुळीच नाहीत.

मात्र त्यांच्यापैकी बर्‍याच जणांना वाटते की त्यांच्याबरोबर जे काही संहारक अथवा वाईट घडत आहे, त्यास अमेरिका आणि ज्यू अगर त्यांचे भांडवलशाही धोरण जबाबदार आहे.

दहशतवादी शक्ती कुराणातील काही शिकवणींचा चुकीचा अर्थ लाऊन जिहादच्या नावावर विद्वेषी मानसिकतेचे बीज त्यांच्या मनांत पेरतात.

अशा स्वरूपाची अतिरेकी भावना निर्माण करणारे घटक आता संपण्याच्या मार्गावर असले तरी भयगंड अगर निराशाजनक परिस्थितीस बळी पडलेले तारुण्य विनाशाच्या मार्गी लागते.

अशा संकट समयी काहीजण बर्‍याचदा आध्यात्मिक मार्गदर्शन घेतात आणि काही तरुण वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या देखील करण्याचा धोका उद्भवतो.

ऐहिक जीवन हे क्षणभंगुर असून पारलौकिक अविनाशी जीवनासाठी शहादत अर्थात बलिदान आवश्यक असते, अशा सुंदर व मोहक शब्दांच्या लेबल खाली ही भावना रुजविण्यात येते.

जणू हे एका दगडाने दोन पक्षी मारल्यासारखे आहे. अमेरिका आणि विशेषत: ज्यू लोक “प्रॉक्सीद्वारे हे जग चालवित आहेत,”असे बर्‍याच मुस्लिमांना वाटते. मलेशियाचे पंतप्रधान डॉ. मुहम्मद महाथीर यांनी देखील याची पुष्टी केली आहे.

अर्थातच जगातील मुस्लिमांवर होणार्‍या अन्याय व अत्याचारांना अमेरिका, ज्यू आणि त्यांचे मित्र असलेली पाश्चात्त्य राष्ट्रे जबाबदार असून या अन्यायाचा प्रतिशोध अगर सूड घेणे हे इस्लाम धर्मात एक गौरवशाली पुण्य कर्म असल्याची भावना निर्माण करून यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येते.

यासाठी कुराणाचे काहीं चुकीचे सन्दर्भ देऊन तरुणांची दिशाभूल करण्यात येते.

जिहादची पाळेमुळे कुराणात आहेत का? तर याचे उत्तर नाही, असेच देता येईल.

काल पर्यंतचे आपल्याच हाडामांसाचे, प्रेमळ, जीव लावणारे आपले जिवाभावाचे मित्र असलेले मुस्लिम बांधव कुराण वाचताच एका रात्रीत दहशतवादी बनतात आणि कालपर्यंत असलेले दोस्त एका रात्रीत आपले वैरी बनतात, हे मुळीच खरे नाही.

असे घडविण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने जहाल भावना निर्माण निर्माण करावी लागते.

मूळ समस्या ही कुराण अथवा मुस्लिमांचा धर्म नसून तिचे मूळ काही वेगळेच आहे.

परिस्थितीचे वास्तविक विश्लेषण न करता एखाद्या अन्यायाचे अति रक्तरंजित वर्णन करून तरुण माथी भडकावून विदारक परिस्थिती निर्माण करण्यात येते.

अशा पद्धतीने कृत्रिमरीत्या रंगविलेल्या परिस्थितीचा संबंध केवळ सांस्कृतिक, पारंपारीक, राजकीय किंवा आर्थिक बाबींशी नव्हे तर धार्मिक संबंधांशी जोडला जातो.

ज्यू आणि मुस्लिमांच्या द्वेषाची मुळे कुराणात असल्याचे भरविण्यात येत असले तरी खरी समस्या मात्र वेगळी आहे.

आज मुस्लिम तरुण ज्या परिस्थिती वा संकटांचा सामना करीत आहे, त्यास जबाबदार बहुतांश संधींची कमतरता, निराशा व यांसारख्या अनेक बाबी आहेत. विशेषत बाब अशी की, तरुणांच्या वास्तविक समस्या सोडविण्यात मुस्लिम नेतृत्वाच्या अपयशाचा सुद्धा परिणाम असू शकतो.

आणखीन एक घटक म्हणजे मुस्लिमांत आत्म-सन्मानाचा अभाव, महत्वहीनपणाची प्रचलित भावना, आत्मविश्वासाचा अभाव व नकारात्मकता सारख्या बाबी सुद्धा याला जवाबदार असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

अशा भावनिक जखमांवर फुंकर घालण्यात येते, ती दहशतवादी हे शूर, लढवैये, दुष्टांचा नाश करणारे असण्याची आणि प्रसंगी बलिदान देण्याच्या भावनेची. एक प्रकारे आत्म गौरव, धार्मिक प्रतिष्ठा इत्यादी सारख्या बाबींची लालसा निर्माण केली जाते.

यातूनच काही वैफल्यग्रस्त मुस्लिम तरुण अशा भावनिक विचारांना बळी पडतात.
आपण आपल्या अशा कृत्याने आपलाच धर्म कलंकित करीत आहोत, असा विचार येऊ न देता ते बंदूक हाती घेतात.

अशा प्रकारच्या डोकी फिरलेल्या तरुणांचा सामना करण्यात मुस्लिम समाज का अपयशी ठरतो? याचे कारण शोधणे गरजेचे आहे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments