Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखप्रेम विवाहाची परिणीती भयावह

प्रेम विवाहाची परिणीती भयावह

या जगात प्रत्येकाला आपली आवड निवड जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे, आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी वयाची कोणतीही बंधने नाहीत. प्रेम या शब्दावर सार्‍या जगात सर्वात जास्त काथ्याकूट झाला. नळ दमयंती, शिरीन फरहाद पासून ते रोम ज्यूलीयेट पर्यंत अनेक प्रेम कथांनी तर कहरच केला. प्रेम म्हणजे काय आणि त्याची नेमकी व्याख्या काय, हे सांगण्याची निदान आज तरी गरज उरलेली नाही. प्रेम बंधन, प्रेमविवाह सारखे शब्द आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे.  प्रेमाशिवाय जीवन नाही, असे जणू समीकरणच झालेले आहे. चित्रपट, नाटक, कथा, कादंबर्‍या, कविता, साहित्य आणि संस्कृती ही मुळातच प्रेमसंबंधांसारख्या बाबींचा बोकायकालाच. मुळात ही वाट खूप काटेरी, कधीही न भरणार्‍या, सतत भळभळणार्‍या जखमांची कहानी आहे. मात्र आजच्या आधुनिक काळात, एकविसाव्या शतकात देखील प्रेमविवाहाचे परिणाम अत्यंत भयावह असल्याचे निदर्शनास येते. या ठिकाणी प्रेमाचा विरोध करण्याचा, लव जिहाद सारख्या बाबींचा उल्लेख करण्याचा उद्देश मुळीच नाही. मात्र याविषयी परिस्थितीचा सारासार विचार करून परिणामांची मीमांसा करणे आणि संभाव्य परिस्थिती ओढण्यापूर्वी सजग करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.

आजही आपल्या देशातील जवळपास सर्वत्रच आई वडील आणि कुटुंबीयांना प्रेमविवाह सहन होत नाही. आपली मुलगी आपला स्वाभिमान असतो. ती जेव्हां परजातीय अगर परधर्मीय पुरुषाशी प्रेम विवाह करते, आपला धर्म सोडून नवर्‍याचा धर्म स्विकारते, तेव्हां तिच्या आई वडील आणि कुटुंबीयांसह संपूर्ण समाजाचाच स्वाभिमान दुखावतो, अहंकार ठेचला जातो आणि हे पचविणे एवढे सोपे नसते. मुलीच्या आईवडिलांवर प्रचंड मानसिक व सामाजिक दबाव येतो. प्रत्येक क्षणी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. किंबहुना मृत्यूपेक्षाही भयानक अवस्थेला सामोरे जावे लागते. धड जगताही येत नाही आणि मरताही येत नाही. समाज सुखाने जगू देत नाही आणि मरूही देत नाही.

आई वडील कितीही आधुनिक असो आणि आपल्या देशातील लोक आधुनिकतेच्या कितीही गप्पा मारो आणि कोणी काहीही म्हणोत. मात्र एक प्रश्न निश्चित भेडसावतो. प्रेम तर अपार उच्च भावनिक असतो ना? मग समजा एखाद्या महिलेने कुण्या परधर्मीय अगर परजातीय पुरुषाशी लग्न केले, तर धर्म तिनेच का बदलावा? प्रियकराने तिचा धर्म का स्विकारू नये? तिचे आडनाव का स्विकारु नये? माहीत आहे? किती भोगावे लागते तिला? किती किती भोगावे लागते तिच्या आई वडिलांना?

आणि काय काय, काय काय, काय काय सोसावे लागते तिच्या कुटुंबीयांना? काय काय बिरुदावली सोसावी लागते आणि काय काय, काय काय, काय काय? मरताही येत नाही आणि धड जगताही येत नाही. प्रेम काय तिने एकटीनेच केलेले असते का?

प्रेमाच्या आणाभाका तर प्रियकराने सुद्धा घेतलेल्या असतात ना? तिच्यासाठी सर्वस्व त्यागाची आण त्यानेही घेतलेली नसते का? तिच्यासाठी चंद्र तारे तोडून आणण्याचे आश्वासन दिलेले नसते का?

मग तिच्यासाठी आणि प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची शपथ घेतलेल्या या प्रियकराला ऐन वेळी त्याचा धर्म आठवतो, जात आठवते, परिवार आठवतो आणि बळी जातो तो प्रेयसीचा, तिच्या आईवडिलांचा. याउलट जर प्रियकरानेच प्रेयसीचा धर्म स्विकारला तर त्याचे काय बिघडणार? तर प्रेयसीच्या तुलनेत त्याचे नुकसान कमीच होईल. उलट खरा पुरुषार्थ गाजविण्याची खरी संधी इथेच मिळेल. शिवाय या पुरुषप्रधान संस्कृतीचा उदो उदो करणार्‍या समाजाला देखील त्याच्या धर्म बदलण्याचा विरोध करणे तिच्या तुलनेने थोडे अवघडच होईल. एवढे विशेष काही वाईट वाटणार नाही आणि वाटले तरी समाज त्याचे विशेष काही वाकडे करू शकणार नाही. मात्र मुलीने जर प्रियकरासाठी धर्म बदलला की तिच्या आई वडिलांसोबत तिच्या पूर्ण कुटुंबीयांचे न भरून निघणारे नुकसान होते, तिच्या आई वडील आणि कुटुंबीयांची तर पार राखरांगोळी होऊन जाते.

बर्‍याच वेळा तिच्या कुटुंबाला समजातून बहिष्कृत करण्यात येते, वाळीत टाकले जाते. सर्वांच्या विक्षिप्त नजरांचा सामना करावा लागतो. सततचे टोमणे सोसावे लागतात. तिच्या मुलांना देखील पूर्ण समाज अतिशय वाईट नजरेने बघत असतो. अनेक ठिकाणी आईवडिलांनी आत्महत्या सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आठवतात. अशा आंतरजातीय व आंतरधर्मीय जोडप्यांच्या मुलांना देखील प्रचंड त्रास भोगावा लागतो. न या निष्पाप मुलांच्या पालन पोषणाचा, शिक्षणाचा, समाजात जगण्याचा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यांना न केलेल्या आणि माहीत देखील नसलेल्या पापांची शिक्षा भोगावी लागते.

शिवाय प्रेमविवाहित संसाराचा गाड़ा यशस्वीपणे वळणावर चालला तर ठीक, मुलगी सुखी समाधानी असली तर ठीक, नसता मुलीचे वाटोळे झाल्याचे अपार दुःख तिच्या आई वडिलांना जन्मभर सोसावे लागते. आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्याचे दुःख मुलीलाही सोसावे लागते. ज्याच्यासाठी आईवडील त्यागले, भाऊबंदकी सोडली, अख्ख्या कुटुंबियांना दुखावले, धर्म सोडला, जात सोडली, समाजाची दुष्मनी विकत घेतली, त्यानेच दगा फटका दिला असल्याचा दाह जन्मभर काळीज जाळत असतो.

अनेकांना प्रेम आणि वासनांतील अत्यंत नाजूक फरक समजत नाही. वासनांनाच प्रेम समजून केलेले लग्न अथवा प्रेमविवाह सहसा यशस्वी होत नाही.

लग्नापूर्वी सर्व संकटांना सामोरे जाण्याच्या कितीही आणाभाका घेतल्या तरी लग्न झाल्यावर मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या जोडप्यात एकोपा असल्याची उदाहरणे खूप कमी आहेत. संकट आले की हेवेदावे सुरू होतात, सतत खटके उडतात आणि दुरावा निर्माण होतो. केवळ प्रेमाने पोट भरत नसते, त्यासाठी भाजी भाकरीची व्यवस्था असावी लागते, हे विदारक सत्य समोर आ वासून उभे राहते. चंद्र तारे तोडून आणण्याच्या शपथा घेवून तिचा हात हातात घेतलेल्या प्रियकराला वास्तविकतेची जाणीव होते आणि प्रेयसीला आपल्या अधिकार व त्याच्या जबाबदार्‍या आठवू लागतात. केवळ शब्दांनी व्यक्त होणारे प्रेम लग्नानंतर मात्र आपला गहिरा रंग सोडायला लागते आणि त्यावर हळू हळू परस्पर द्वेषाच्या काळ्या छटा तयार होत जातात. नात्यात दुरावा निर्माण होत जातो. दोघांच्या कुटुंबातील कलह सुद्धा वाढीस लागलेला असतोच आणि त्यांचा अहंकार अशा प्रकारच्या लग्नांचा स्विकार करायला सहसा तयार होत नाही, ही आपल्या देशातील लोकांची जुनीच मानसिकता होय.

प्रेमविवाहानंतर संसाराचा गाडा परस्पर द्वेषाच्या वळणांवर येऊन ठेपतो. दोघात ताटातून होऊन जाते. या उलट अरेंज मॅरेज मध्ये सहसा अशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत नाही. प्रारंभी नवरा बायको परस्परांना अनोळखी असले तरी आईवडील, कुटुंबीय आणि पूर्ण समाजाच्या सहमतीने होणारे विवाह यशस्वी होत असल्याचीच आणि अशा नवरा बायकोच्या संसाराचा गाडा जीवनाच्या खडतर वाटा आणि अनेक उतार चढाव पार करीत यशस्वीपणे चालत असल्याचीच जास्त उदाहरणे आहेत.

आणि म्हणुनच विवाह म्हणजे केवळ दोन स्त्री पुरुषाच्या नव्हे तर दोन परिवारांना जोडणारे एक बंधन असून यातूनच कुटुंब व्यवस्था उभी राहते, अबाधित राहते, सामाजिक व्यवस्था शाबूत राहते, असे मानणे उचितच ठरेल. समान जात, समान धर्म आणि समान कुटुंब असल्याचा धागा अशी व्यवस्था विस्कळित होऊ देत नाही, ही त्यातील जमेची बाजू.

ते परस्पर न्याय करतात, जबाबदार्‍या पार पाडतात.

आपल्या देशात परंपरा व रुढीवादाची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. पाप पुण्याची धारणा खूप मजबूत आहे. हे पातक पिढ्यानपिढ्या पिच्छा सोडत नाही, यावर लोकांचा दाट विश्वास आहे. देशाच्या संस्कृतीचा आधारच मुळात रूढ़िवाद आहे. याशिवाय सामाजिक मूल्यांची साधी कल्पना देखील शक्य नाही. सर्वप्रकारचे दुःख आणि संकटे झेलून सुद्धा सामाजिक मूल्यांची जोपासना करणे हे प्रत्येक जण आपले कर्तव्य समजत असतो. त्यातही मुख्य म्हणजे आईवडील देवतासमान असून तेच आपल्या पाल्याच्या जीवनाचा बरावाईट निर्णय घेऊ शकतात, प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि त्याहीपुढे आपल्या पाल्यांना रोजगार मिळवून देईपर्यंत आईवडील जिवाचे रान करतात, अशी पक्की धारणा आहे आणि त्यात तथ्य देखील आहे. आईवडील आपल्या मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठमोठे बलिदान देतात. अगदी हलाखीच्या परिस्थितीत देखील स्वतः अर्धपोटी राहून मुलांना खाऊ घालतात. लहानाचे मोठे करेपर्यंत नाना संकटांचा सामना करतात. मुलांना साधा काटा जरी रुतला तर आईवडिलांच्या काळजाचे तुकडे होतात. तासभर बाहेर गेलेली मुले परत येईपर्यंत त्यांच्या जिवात जीव नसतो. आपल्या मुलांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी ते सतत काळजी घेत असतात. त्यातही लग्न म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो आणि हा निर्णय का एकदा चुकला तर मात्र याची भरपाई होत नसते, याची तीव्र जाणीव त्यांना असतेच. यासाठीच ते इतर दुसर्‍या निर्णयांच्या तुलनेत मुलांच्या या निर्णयाची सर्वांत जास्त काळजी करतात. त्यातही मुलीच्या बाबतीत आईवडील आणि सर्व कुटुंबीय जास्तच हळवे असतात. लग्न झाल्यावर आपली मुलगी सुखी समाधानी असावी, तिला कोणत्याही वस्तूची कमतरता भासू नये, याचीच सर्वात जास्त काळजी त्यांना असते. यातूनच जावयाचे अतिरिक्‍त लाड देखील आपल्या मुलीच्या सुखासाठी ते सहन करतात. एवढे सगळे काही असून देखील अविवेकीपणातून मुलांनी घेतलेला प्रेमविवाहाचा निर्णय त्यांच्या आईवडिलांना कोणत्या थरावर नेऊन पोचवतो, कोणत्या वळणावर नेऊन सोडतो, त्यांना कोणत्या असह्य दुःखाच्या सागरात नेवून बुडवितो, याचा विचार करायला हरकत नाही.

प्रेम करा, निश्चित करा, माणूस असला की प्रेम हा शब्द असलाच, प्रेम करणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध आणि निसर्गदत्त अधिकार आहे. मात्र त्याग ही प्रेमाची कसोटी असते. शिवाय आपण अद्याप कसोटी पाहिलेली नसली तरी ती पाहण्यासाठी आपल्या आईवडिलांनी आपल्यावरील प्रेमाखातर केलेल्या त्यागाचे, बलिदानांचे  दर्शन निश्चितच करावे आणि मगच निर्णय घ्यावा, हे मुलांच्या देखील हिताचे ठरेल आणि देशाच्या देखील हिताचे ठरेल.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments