Tuesday, April 30, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभ्रष्टयंत्रणेचे बळी!

भ्रष्टयंत्रणेचे बळी!

देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरीत मृत्यूचा नंगानाच लागोपाठ सुरुच आहे.  राजकारणी,प्रशासन,पोलिस,भांडवलदार यांच्या साखळीने चिरीमिरीसाठी सर्व नियमांची ऐशीतैशी करुन ठेवली. भ्रष्ट साखळीमुळे हॉटेल,कंपन्यांना आग,इमारत दुर्घटना,चेंगराचेंगरी,अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण,रस्त्यांवर विक्रेत्यांचा सुळसुळाट असे एक ना अनेक प्रकार घडत असतांना शुक्रवारी मध्यरात्री लोअर परळमधील प्रसिद्ध कमला मिल्स कंपाऊंडमध्ये हॉटेल मोजो ब्रिस्ट्रो रेस्तराँ अॅण्ड पबमध्ये भीषण अग्नितांडवामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. १२ जण गंभीररित्या भाजले गेले. आगीप्रकरणी मुंबई महापालिकेतील पाच दोषी अधिका-यांना निलंबित केले. उच्चभ्रू असलेल्या या परिसरात इतकी मोठी आग लागल्याने मुंबईसह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. अबव्ह या ओपन एअर रूफटॉप लाऊंज मध्ये पूर्णपणे ताडपत्री आणि बांबू स्ट्रक्चरनं कव्हर केलं होतं. हे स्ट्रक्चर अनधिकृत असल्यानं त्याला महापालिकेनं नोटीसही बजावली होती. शेवटी चिरीमिरी जिंदाबाद ना? कमला मिल कंपाउडमध्ये एकच रस्ता होता आणि तिथे आग लागल्यानं लोकांना बाहेर जाता आलं नाही. त्यातच तिथे उपस्थित असलेल्यांच्या अंगावर संपूर्ण लाकडी स्ट्रक्चर कोसळलं. पाहाता पाहाता होत्याचे नव्हते झाले. घाटकोपर येथील सिद्धीसाई इमारत कोसळून १७ जण ठार झाले होते. भायखळा इथं पाच मजली बिल्डिंग कोसळून २२ जण ठार झाले. २९ सप्टेंबर मध्ये एलफिन्स्टन रोड स्टेशनवरील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ ठार, १८ डिसेंबरला मुंबईच्या साकीनाका परिसरात फरसाणाच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. महापालिका कर्मचारी इमारत, डॉकयार्ड रोडला २७ सप्टेंबर २०१३ रोजी पहाटे सहा वाजता इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाला होता. कुर्ला येथील ‘सिटी किनारा’ हॉटेलला लागलेल्या आगीत आठ जण मृत्युमुखी पडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने मुंबईतील प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीतील हॉटेल्सची तपासणी सुरू केली होती परंतु सर्व तपासण्या या कागदोपत्रीच झाल्या. अनेक हॉटेल्सविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र भ्रष्ट साखळीमुळे सर्व काही नियम धाब्यावर बसून सुरळीत सुरु आहे. कमला मिलमधील जवळपास ३० रेस्टॉरंटमध्ये बारकक्ष नसतानाही या हॉटेल्सना परवानगी देण्यात आली. हॉटेल्स आणि हुक्का पार्लरचं फायर ऑडिटच्या नावावर अधिकारी चिरीमिरी करुन परवानग्या देऊन मोकळे होतात. व त्यामुळे आगीच्या,घटना घडत असतात. आज मुंबई व उपनगरातील  हॉटेल,खानवळ,हुक्कापार्लर,इमारतीचा विचार केला तर तेथे फायर ऑडिटची विशेष काळजी नसते त्यामुळे आगीचे प्रकार होतात. अग्नितांडवामुळे राजकीय मंडळींनी चौकशीची मागणी केली. या प्रकरणाची चौकशीही झाली पाहिजेत. परंतु चौकशीने काहीही होणार नाही. कारण सर्व यंत्रणा भ्रष्ट असल्यामुळे सर्वांचेच पितळ उघडले पडतील. यामुळे छोट्या अधिकाऱ्यांवर थातूरमातुर कारवाई करुन यावर पडदा टाकण्यात येईल. मात्र जे १४ जीव गेले ते परत येणार नाही. त्या जिवाचे काय? हॉटेल मालकावर गुन्हे दाखल झाले कारवाई होईल. मालकांना जामीनही मिळून जाईल मात्र त्या जिवांचे काय हाच प्रश्न शेवट पर्यंत अनुत्तरीत राहिल. शेवटी अगीच्या घटना घडत असता त्याच प्रकारे धोकादायक इमारतींचाही असाच प्रश्न आहे. इमारत दुर्घटनेनंतरही जीव जातात चर्चा होते. पुन्हा घटना घडली की चर्चा होतात. कमला मिलमधल्या अग्नितांडवाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दु:ख  व्यक्त  केलं. चौकशीची मागणी केली. परंतु भ्रष्ट यंत्रनेला वठणीवर आणण्यासाठी सर्व एकत्र का येत नाही. कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी कठोर कायदे का बनवत नाही. फक्त काही घटना घडली की हळहळ व्यक्त होते. भ्रष्ट साखळी जो पर्यंत तुटत नाही पर्यंत सर्वसामान्यांचा जीव जात राहिल. यामुळे सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments