Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखखडसेंची राजकीय शाळा!

खडसेंची राजकीय शाळा!

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे स्वत:च्याच पक्षात दु:खी असल्याचे जगजाहीर आहे. भोसरी प्रकरणावरुन मंत्रीपद गमावून बसलेले खडसेंची कोंडी होत असल्यामुळे इतर पक्षांच्या व्यासपीठावर जाऊन ते आपले दुखणे व्यक्त करत आहेत. जळगावात एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून खडसे बसले होते. खरतर हेच खडसे राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला म्हणून विरोधी पक्षात असतांना आक्रमक होत होते. खडसेंवर आता वाईट वेळ आल्यावर ते स्वत:च्या मनातलं अजित पवारांच्या कानात बोलले असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. आणि अजित पवारांनीही ते कानात काय बोलले ते मी बोलणार नाही असे स्पष्ट केले. खरतर ते कानात काय बोलले हे जाहीरपणे सांगण्याची काही गरज नाही कारण यालाच राजकारण म्हणात. वारंवार ते भाजपाला सत्तेत आणण्यासाठी मी मेहनत घेतली ४० वर्ष मी पक्षासाठी दिले असे ते बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात सत्यताही आहे. परंतु राजकारणात ज्यावेळी मोठ्या पदाची आकांक्षा ठेवली जाते त्यावेळी स्पर्धेकही वाढून जातात. खडसेंनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करुन दाखवली होती आणि तेव्हा पासूनच त्यांचे पक्षातील स्थान डगमगळले होते. नाशिक जिल्ह्यातील भोसरी प्रकरण हे फक्त निमित्त होते. खडसेंवर आरोप लावून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांचे अंतर्गत विरोधकांनी विजय मिळवला. सध्या तरी खडसेंच्या राजकीय कारर्कीदीला ग्रहण लागले आहेत. खडसे यांचे मुख्यमंत्रिपदाचे जे स्वप्न होते ते तर सध्यातरी पूर्ण होणार नाही हे राजकीय ज्योतीषाला विचारण्याची गरज नाही. खडसे यांचा राजकीय प्रवास जरी मोठा असली तरी त्यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजकीय गेम केल्यामुळे त्यांची अवस्था ना घर का… ना घाट का अशी झाली आहे. खडसे यांना राष्ट्रवादीकडून इशारे देण्याचे काम चालू आहेत. मात्र खडसे आज भाजपाला ‘राम राम’ करणार नाही. कारण पक्षश्रेष्ठी त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न करतील. सत्तेचा पॉवर असल्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणतेही आरोप करुन चौकश्यांचा शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लावून त्यांना अडकून टाकतील ही सर्वात मोठी भिती खडसेंच्या मनात आहे. नागपूरमध्ये अधिवेशनाच्या काळात संघाने बौध्दीक वर्गाचे आयोजन केले होते. या बौध्दीक वर्गाला खडसे तसेच काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी दांडी मारली होती. पक्षाने अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांना नोटीसा पाठविल्या होत्या. यावेळी खडसेंनी माध्यमांना जे उत्तर दिले होते ते हास्यास्पद होते. खडसे म्हणाले होते माझ्या पायाचा त्रास होता म्हणून अनुपस्थित राहिलो. खरतर त्यांच्या नाराजीमुळे ते अनुपस्थित होते. पक्षाच्या वतीने त्यांना नोटीसा पलिकडे काहीच दिले नाही. आज खडसे यांची भाजपात अवस्था वाईट असल्यामुळे ते भाजपावर राजकीय दबाव आणण्यासाठी अजित पवारांच्या कानात काही तरी बोलले असतील. परंतु भाजपाच्या पक्षश्रेष्ठी खडसेंना किती गांभीर्याने घेतात हा काळच ठरवेल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments