मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
वर्षा बंगल्यावर काय घडलं?
दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती.
सपत्नीक भेटण्यामागे कारण काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला. संजय राठोड यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात होती.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय?
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी बसवली जाण्याची चिन्हं आहेत. यानुसार संजय राठोड यांचीही चौकशी केली जाईल. राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
वनमंत्रिपद कोणाला?
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल. शिवसेनेत लॉबिंग चालत नाही, असं म्हटलं जातं. पण वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं कळत आहे. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का यासाठी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महंत राठोडांच्या पाठीशी
दरम्यान, पोहरादेवीच्या महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं आवाहन महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं होतं.