पुणे: सर्वत्र कोरोना विषाणूने कहर माजविला आहे. पुन्हा लॉकडाऊन लागणार अशी शक्यता निर्णाण झाली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लस आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र, पुण्याच्या ससून रुग्णालयातील एका नर्सने कोरोनाची लस घेऊन देखील तिला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस
सदर नर्सने काही दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, तिला कोरोनाची लक्षण जाणवू लागली. कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने तिने कोरोनाची चाचणी करून घेतली असता तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सदर नर्सला कोरोनाची लागण झाली असली तरी घाबरुन जाऊ नका काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्येही घडला होता असाच प्रकार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात देखील असाच काहीसा प्रकार घडला होता. शासकीय रुग्णालयातील फार्मासिस्टने कोविड प्रतिबंधक लस घेतली होती. त्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी तो काही कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्याला देखील कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
उत्तरप्रदेशात कोरोना लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू
उत्तरप्रदेशात मुरादाबाद येथे देखील एक धक्कादायक घटना घडली होती. कोरोनाची लस घेतलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याचा व्यक्तीचा मृत्यू झाला होता. १६ जानेवारीला या व्यक्तीला कोरोनाची लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळली. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे नाव महिपाल असून ते रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता.