नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी देण्यासाठी सत्र न्यायालयानं नवीनं डेथ वॉरंट जाहीर केलं आहे.
या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यावर दिल्ली न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. दिल्ली न्यायालयाने या चौघांचे डेथ वॉरंट जारी केलं होतं. या डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुकेशने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. आता हा अर्जही राष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवण्यात आलं आहे.
राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळून लावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १४ दिवसांचा कालावधी नव्या डेथ वॉरंटसाठी द्यावा लागेल. त्यामुळे या चौघांना २२ जानेवारी रोजीचा दिवस टळला आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी दिल्ली सरकारकने याआधीच आपली भूमिका स्पष्ट करत, दया अर्ज फेटाळल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी द्यावा लागणार असल्याने २२ जानेवारी रोजी फाशी देता येणार नाही असं म्हटलं होतं.
जो पर्यंत दोषींना फाशी होत नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही…
जो पर्यंत आरोपींना फाशी होत नाही तो पर्यंत समाधान मिळणार नाही. फक्त आम्हाल तारीख पे तारीख मिळत आहे. मी सात वर्षापासून संघर्ष करत आहेत. आधी २२ जानेवारीला आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आता १ फेब्रुवारीला फाशी दिली जाणार आहे. जो पर्यंत आरोपींना फाशी होत नाही तो पर्यंत मला समाधान मिळणार नाही. असं निर्भयाची आई आशा देवी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.