मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात चर्चेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्ष सचिन वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, विरोधी पक्षाच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 10 मार्च रोजी सभागृहातून घोषणा केली होती की वाझे यांना क्राइम ब्रांचमधून हटवण्यात आले. त्यानंतर 12 मार्च रोजी रात्री उशीरा त्यांना क्राइम ब्रांचमधून नागरी सुविधा केंद्र विभागात हलवण्यात आले आहे.
जगाचा निरोप घेण्याची वेळ आली -वाझे
याच दरम्यान, सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्याला सीआयडी अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आल्याचा दावा केला. आपल्याला चुकीची वागणूक आणि चुकीच्या पद्धतीने खोट्या आरोपात अडकवले जात आहे. एवढेच नव्हे, तर आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आली असेही त्यांनी लिहिले आहे.
आता मनसुख हिरेन प्रकरणी अटक होऊ नये यासाठी वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारून सुनावणीसाठी 19 मार्चची तारीख दिली आहे.
काय आहेत आरोप?
25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटके सापडली त्याचा मालक मनसुख हिरेनचा 5 मार्च रोजी मृतदेह सापडला. मनसुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या ATS करत आहे. मनसुखच्या पत्नी विमला यांनी आपल्या पतीच्या हत्येसाठी वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
त्यांनी यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना देखील पाठवले होते. तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विमला यांचा जबाब सभागृहात वाचून दाखवला. त्या जबाबात मनसुख हिरेनची हत्या कथितरित्या वाझे यांनी केल्याचा थेट आरोप करण्यात आला.
यानंतरच गृहमंत्र्यांनी सभागृहात वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. स्कॉर्पिओ सापडल्याच्या एका आठवड्यानंतर मनसुखचा मृतदेह सापडला. तो मनसुखच्या घरापासून 7 किमी दूर होता. मनसुख यांच्या पत्नीने हेदेखील आरोप केले होते, की गेल्या 4 महिन्यांपासून वाझेच त्यांच्या पतीची स्कॉर्पिओ कार वापरत आहेत.
कार चोरीचे पुरावे नाहीत…
मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला. त्यानुसार, कारचे चेसिस नंबर ग्राइंडरने खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, कार चोरण्यासाठी दाराशी छेडछाड करणे किंवा तोडफोड करण्याचे पुरावे सापडलेले नाहीत. अर्थातच कथित चोराला ती कार अगदी सहजपणे घेऊन जाता आली.