मुंबई: महाराष्ट्रात कोरोना उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आलेला आहे. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सूचक इशारा दिलेला आहे. आज (शनिवार) दिवसभरात राज्यात ८८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन कोरोनाबाधित वाढले आहेत.
सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. याशिवाय आज ७ हजार ४६७ रुग्ण कोरोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.४९ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत तर ५ हजार ३१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,१८,५२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
काही दिवसांमध्ये देशभरात नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेसोबतच राज्यातील आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारची देखील चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हॉटेल, उपहारगृह आणि मॉलच्या प्रतिनिधींची ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कळकळीचं आवाहन करताना कडक निर्बंधांबाबत देखील इशारा दिला आहे.