सीकरः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी धारदार होताना दिसू लागले आहे. किसान महापंचायतींचे आयोजन करत देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिल्ली कान खोलकर सुन ले, पुढचा मोर्चा संसदेवर असेल. ४ लाख नव्हे तर ४० लाख ट्रॅक्टरसह संसदेला घेराव घालू, असा इशारा दिला आहे.
राकेश टिकैत हे शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर आले आहेत. महापंचायतींचे आयोजन करून ते विविध राज्यातील शेतकरी राजकारणाचा आढावा घेत आहेत. टिकैत यांनी मंगळवारी राजस्थानच्या सीकर येथे आयोजित शेतकरी महापंचायतीला हजेरी लावली. या महापंचायतीलाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
वाचा: ड्रग्ज प्रकरणात भाजपा नेत्यासह दोन मुलांना ठोकल्या बेड्या
शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रणगाडाच आहे. दिल्लीच्या चकाकत्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चालेल. त्यांनी लाल किल्ल्याचे नाव घेतले. लाल किल्ला तर भूतांचे घर आहे. दिल्ली कान खोलकर सुन ले, पुढचा मोर्चा संसदेवर असेल. आम्ही सांगून येऊ. आमच्यासोबत ४ लाख नव्हे तर ४० लाख ट्रॅक्टर असतील, असे टिकैत यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनाची पुढची लढाई राजस्थानातून लढली जाईल. यावेळी लाल किल्ल्यावर नव्हे तर संसदेवर जाऊ. संसद आणि इंडिया गेटच्या बाहेर तयार केलेल्या उद्यानात ट्रॅक्टर चालेल. तेथे नांगर चालवू अन्यथा दिल्लीची घेराबंदी करू, असे टिकैत म्हणाले. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाच्या हमी भावाचा कायदा लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दिल्लीच्या मोर्चासाठी तयार रहा. त्या आंदोलनासाठी कधीही हाक दिली जाऊ शकते, असेही टिकैत म्हणाले. मंगळवारीच टिकैत यांनी राजस्थानच्या सरदारशहर आणि चुरूमध्येही शेतकरी महापंचायत केली. या महापंचायतींना स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.