कोलकाता: पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपा नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलांना घरातून अटक करण्यात आली आहे. ते पश्चिम बंगालमधून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
भाजपा युवा मोर्चाची पदाधिकारी पामेला गोस्वामी हिला पोलिसांनी कोकेन आणि १० लाख रुपयांसह पकडले होते. पोलिसांनी याप्रकरणी पामेला गोस्वामी हिच्यासह दोन जणांना अटक केली होती. या प्रकरणात भाजपाचे नेते राकेश सिंह यांचं नाव समोर आलं होतं. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि भाजपाचे महासचिव असलेल्या कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय असलेल्या राकेश सिंह यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.
नोटीस बजावल्यानंतर राकेश सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांच्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पोलीस राकेश सिंह यांच्या घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलामध्ये बाचाबाची झाली.
कोलकाता पोलिसांनी त्यानंतर घराची झाडाझडती घेतली. राकेश सिंह यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना ४ वाजेपर्यंत हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते बंगालमधून फरार होण्याच्या प्रयत्नात असल्याच्या माहितीनंतर कोलकाता पोलिसांनी राकेश सिंह यांना पूर्व वर्धमान जिल्ह्यात अटक केली. त्याचबरोबर पोलिसांच्या कारवाई व्यत्यय आणल्याबद्दल राकेस सिंह यांच्या दोन्ही मुलानांही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मुलांना राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतलं.