मुंबई : अजित पवार यांच्या विरोधातील सिंचन घोटाळयातील असलेले बैलगाडीभर पुरावे भाजपने रद्दीत विकलेले आहेत. भाजपला महाराष्ट्रातून सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
हेतूपुरस्सर मला, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर अशा काही जणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आलं. त्याच्यामुळे निश्चितच पक्षाला फटका बसला, असा घणाघाती आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. आम्हाला सोबत घेऊन चालला असतात, तर वीस पंचवीस जागांचा फरक निश्चितच पडला असता. याचा जाब आम्ही वेळोवेळी पक्षाला विचारलेला आहे, वरिष्ठांना विचारलेला आहे, अशा शब्दात एकनाथ खडसेंनी संताप व्यक्त केला.
वर्षानुवर्ष काम केलेल्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचं जनमानसात चित्र आहे. सर्वांनी एकत्र काम केलं तर पक्षाला बळ मिळतं. पक्षात नवीन आणलेल्यांना तिकीट दिल्याचाही फटका बसला. पार्टी विथ डिफरन्स या भाजपच्या बिरुदाला, भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेला धक्का पोहचला. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना सोबत घ्यायला नको होतं, असं माझं मत असल्याचं खडसे म्हणाले.