मुंबईच्या माहिम बीचवर एका सुटकेसमध्ये शरीराचे तुकडे सापडले. सुटकेसमध्ये हात आणि पायाचे तुकडे सापडले यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माहिम बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या लोकांमुळे हा प्रकार उघडकीस आला.
सुटकेस समुद्रातून वाहून आल्य़ाचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. सुटकेसमध्ये उजवा पाय आणि डावा हाथ सापडला आहे. नागरिकांनी गजबजलेल्या ठिकाणी असं मानवी शरीर कापून ठेवलेलं सुटकेस सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पोलिसांनी हे सुटकेस ताब्यात घेतलं असून त्यातील मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हा महिलेचा की पुरुषाचा मृतदेह आहे हे अद्याप समजू शकलं नाही. सापडलेल्या शरीराच्या तुकड्यांमध्ये संपूर्ण मृतदेह नसून त्यात शरीराचे अर्धेच भाग आहेत. त्यामुळे मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात मृतदेहाचे इतर भाग शोधण्याचं काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.