Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाजालनामहादेव जानकरांना काँग्रेसची ऑफर!

महादेव जानकरांना काँग्रेसची ऑफर!

जालना : “राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर हे ओबीसींचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी काँग्रेससोबत यावं, अशी खुली ऑफर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते, माजी खासदार राजीव सातव यांनी जानकरांना दिली आहे.

महादेव जानकर यांच्यावर आमचे १०० टक्के प्रेम आहे. त्यावर काहीही दुमत नाही. ते मेहनत आणि कष्ट करणारे नेते आहेत, असेही राजीव सातव म्हणाले. प्रथम मंडल स्तंभ निर्माते माजी आमदार नारायण मुंडे यांचा ७५ वा अमृत महोत्सव सोहळा आणि सामाजिक न्याय मेळावा घेण्यात आला होता. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील संत ज्ञानेश्वर कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा मेळावा पार पडला. यावेळी राजीव सातव यांनी हे वक्तव्य केलं.

जानकरांना तिन्ही वेगवेगळ्या रुपात, भूमिकेत पाहिलं

“आताच जानकरांचे भाषण झालं. त्यांना मंत्री व्हायच्या आधी, मंत्री असताना आणि सरकार बदलल्यानंतर अशा तिन्ही वेगवेगळ्या रुपात आणि भूमिकेत आपण त्यांना पाहिलं आहे. जानकरांवर आमचे १०० टक्के प्रेम आहे. त्यावर काहीही दुमत नाही. ते मेहनत करणारे कष्ट करणारा नेते आहेत,” असेही सातव यावेळी म्हणाले.

“सातव आता तुमचं सरकार आहे. तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे, आता काय मी मंत्री नाही, असे मघाशी जानकर म्हणाले. मात्र जानकरांसारखे ताकदीचे नेते आणि कार्यकर्ते सोबत यावं असं कोणाला वाटत नाही. त्यामुळे आमची खुली ऑफर आहे. तुम्ही कधीही विचार करा,” असे वक्तव्य राजीव सातव यांनी यावेळी केलं.

पंकजा मुंडे यांचं भाजपमध्ये फार काही चालत नाही

“आपण भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या विश्वासावर आणि शब्दावर भाजपसोबत गेलात. त्या ठिकाणी ५ वर्ष कामही केलं. पण आता मुंडे साहेब नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं भाजपमध्ये फार काही चालत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नवीन मार्गाचा विचार करत असाल तर खुलं निमंत्रण मी या कार्यक्रमात तुम्हाला देतो. हे देण्यासाठीही मी मागे पुढे पाहत नाही,” असेही सातव यावेळी म्हणाले.

“कष्ट करणारा, एखादी मागणी घेऊन काम करणार असं जानकरांचे नेतृत्व आहे. जानकरांवर आमचं बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं. त्यामुळे आता मी खुली ऑफर देतो. आता ते काय विचार करतात तो पुढचा विषय आहे,” असेही सातव  म्हणाले.  जानकर हे भाजपचे मित्र पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहेत. मात्र, ते काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments