मुंबई: मुंबईमध्ये मॉलमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. भांडूपमधील या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर जवळपास ७० करोना रुग्णांची सुटका करण्यात आली. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात ही आग लागली.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान सनराईज रुग्णालयाने निवेदन प्रसिद्ध करत मृत्यू करोनामुळे झाले असून आगीचा त्यांच्याशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबईत एकीकडे करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. गुरुवारी मुंबईत तब्बल ५५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचंही रुग्णालयाने सांगितलं आहे. आग लागल्यानंतर सुरुवातीला दोन जणांचा मृत्यू झाल्याचं सागंण्यात आलं होतं, तर काहीजण अडकल्याची भीती होती. पण सध्या मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे. आगीवर अद्यापही नियंत्रण नसल्याने परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे.
“आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी एएनआयला दिली होती.
” ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आलं असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे. याशिवाय इतर रुग्ण इतर रुग्णालयांमध्ये दाखल आहेत,” अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये हॉस्पिटल पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.