कर्ज या चित्रपटात रवी वर्माच्या व्यक्तिरेखेत असलेला राज किरण हा अभिनेता आजही आपल्या चांगल्याच लक्षात आहे. राज किरणने त्याच्या कारकिर्दीत प्यार का मंदिर, तेरी मेहेरबानीयाँ, वारिस, घर एक मंदिर, इल्जाम, अर्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. राज किरणने शेखर सुमनच्या रिपोर्टर या मालिकेत देखील काम केले होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून तो अभिनयापासून दूर आहे. एवढेच नव्हे तर इंडस्टीतील कोणत्याही व्यक्तीच्या तो संपर्कात नाहीये. राज किरण कुठे गायब झाला याचा शोध त्याचे मित्रमैत्रीण अनेक वर्षांपासून घेत आहेत.
राज किरणच्या घरात काही प्रोब्लेम झाल्यामुळे त्याने सगळ्यांशीच संपर्क तोडला असल्याचे म्हटले जाते. अभिनेत्री दिप्ती नवलने राजसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे दिप्ती आणि राजचे नाते खूपच चांगले होते. दिप्ती गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तिने काही वर्षांपूर्वी तिच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, राज किरण हा अभिनेता सध्या न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवत असल्याचे मी काही लोकांकडून ऐकले आहे. कोणालाही त्याच्याविषयी काहीही माहिती असेल तर माझ्याशी त्वरित संपर्क साधावा. दिप्ती प्रमाणेच अभिनेता ऋषी कपूरही आपल्या मित्राचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहे. राज न्यूयॉर्कमध्ये आहे हे कळल्यावर ऋषीने अनेक वेळा त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. राजचा मृत्यू झाला असल्याचे अनेकजण त्याला सांगत होते. पण तरीही खरे काय आहे हे शोधण्याचे ऋषीने ठरवले आणि त्याने राजचा भाऊ गोविंद मेहतानीची भेट घेऊन राज कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज जिवंत आहे. पण तो मानसिक रुग्ण बनला असून गेल्या अनेक वर्षांपासून मेंटल हॉस्पिटलमध्ये असल्याचे ऋषीला कळले. एकेकाळी राजला अभिनयक्षेत्रात प्रचंड यश मिळाले होते. पण आज तो मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. एवढेच नव्हे तर त्याला पैशांची अडचण असल्याने तो त्याच रुग्णालयात छोटी मोठी कामे करून स्वतःच्या उपचाराचा खर्च भागवत आहे.