एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया मानुषी छिल्लर हिने शनिवारी रात्री इतिहासाची पुनरावृत्ती केली. होय, प्रियांका चोप्राने १७ रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करत, मानुषीने ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट मिळवला. शनिवारी चीनमध्ये रंगलेल्या नेत्रदीपक सोहळ्यात मानुषीने भारताला विजेतेपद मिळवूद देत, ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर आपले नाव कोरले. हा बहुमान मिळवणारी ती पाचवी भारतीय सौंदर्यवती आहे. भारताला इतका मोठा बहुमान मिळवून देणाऱ्या मानुषीबद्दल जाणून घेऊ यात, आणखी काही गोष्टी…
२० वर्षीय ही सुंदरी हरियाणाच्या सोनिपतची रहिवाशी आहे. तीन भावंडांमध्ये दुस-या क्रमांकाच्या मानुषीचा जन्म १४ मे १९९७ रोजी झाला. सोनिपतच्या भगत फूल सिंह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ती वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत आहे.
मानुषीचे वडिल डॉक्टर मित्र बसु छिल्लर हे डिआरडिओमध्ये शास्त्रज्ञ आहेत. तर आई डॉक्टर नीलम छिल्लर न्युरो केमिस्ट्रीत हेड ऑफ डिपार्टमेंट आहे. मानुषीने दिल्लीच्या सेंट थॉमस स्कुलमधून शालेय शिक्षण घेतले आहे.
तिने कुचिपुडी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. राजा आणि राधा रेड्डी अशा नामवंत गुरुंकडून तिने या नृत्याचे धडे गिरवले आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा भाग राहून चुकलेल्या मानुषीला फावल्या वेळात पोहणे आणि पेन्टिंग करणे आवडते. तिला कविता करण्याचीही आवड आहे. मानुषीचे इंग्रजीवर विशेष प्रभुत्व आहे. १२ व्या वर्गात इंग्रजीच्या ऑल इंडिया सीबीएसई परिक्षेत ती टॉपर होती.
‘मिस इंडिया’शिवाय मानुषीने मिस फोटोजेनिकचा अवार्डही आपल्या नावावर केला आहे. ती ‘मिस हरियाणा’ही राहून चुकली आहे. मानुषी एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया २०१७ आहे.