skip to content
Friday, May 24, 2024
Homeमनोरंजनरसिक मनावर छाप सोडलेल्या स्मिता पाटील

रसिक मनावर छाप सोडलेल्या स्मिता पाटील

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा उल्लेख होईल, तेव्हा स्मिता पाटील यांचं नाव अग्रस्थानी असेल. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षात जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती. १७ ऑक्टोबर या जयंती निमित्ताने स्मिता पाटील यांच्या आयुष्याचा बद्दल घेतलेला हा आढावा.

स्मिता पाटील यांच्या निधनाला ३१ वर्ष उलटली, पण चाहते त्यांना विसरु शकलेले नाहीत. स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अभिनय केलेले १४ चित्रपट प्रदर्शित झाले. ‘गलियों के बादशाह’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. व्यावसायिक आणि समांतर अशा दोन्ही चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या.

१७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, तर त्यांची आई समाजसेविका होती. १६ व्या वर्षी त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. दूरदर्शनच्या स्टुडिओत त्या जीन्स घालून जात, त्यानंतर अँकरिंग करताना जीन्सवरच साडी नेसत.

स्मिता पाटील यांची भेट निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याशी झाली. स्मिता यांची प्रतिभा ओळखून त्यांनी ‘चरण दास चोर’ चित्रपटात त्यांना एक लहानशी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी दिली. ८० च्या दशकात स्मिता पाटील व्यावसायिक सिनेमाकडे वळल्या. सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत ‘नमक हलाल’ आणि ‘शक्ति’ सारखे चित्रपट त्यांना करता आले.

१९८५ मध्ये स्मिता पाटील यांची भूमिका असलेला केतन मेहता दिग्दर्शित ‘मिर्च मसाला’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली.  सिनेक्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलं. भूमिका आणि चक्र सिनेमांसाठी त्यांना दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, तर चार फिल्मफेअरही त्यांनी पटकावले.

स्मिता पाटील यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास एका दशकापेक्षाही कमी कालावधीचा होता. मात्र त्यांनी ८० पेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या. जैत रे जैत, उंबरठा, निशांत, चक्र, मंथन, भूमिका, गमन, आक्रोश, अर्थ, बाजार, मंडी, मिर्च मसाला, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, अर्धसत्य, शक्ति, नमक हलाल, अनोखा रिश्ता यासारखे अनेक चित्रपट गाजले.

बिग बीं बाबत स्मिता पाटील यांचं तेवाईट स्वप्न!

स्मिता पाटील यांचं वैयक्तिक आयुष्यही अनेक वादांमुळे गाजलं. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत वाढत्या जवळीकीमुळे मीडियामध्ये त्यांची चर्चा झाली. नादिरासोबत लग्न झालेलं असतानाही स्मिता पाटील सोबत सुरु असलेलं राज यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चर्चेचा विषय ठरलं.

स्मिता पाटील-राज बब्बर यांच्या नात्याला स्मिता यांच्या आईचा विरोध होता. महिलांच्या हक्कासाठी लढणारी स्मिता दुसऱ्या स्त्रीचा संसार कसा मोडू शकते, हा प्रश्न त्यांना सतावत असे.

मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर १३ डिसेंबर १९८६ ला वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला.

स्मिता यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे मेंदूला संसर्ग झाला. स्मिता यांनी बाळाला सोडून हॉस्पिटलला जाण्यास टाळाटाळ केली. मात्र आजारपण वाढताच त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा एक-एक अवयव निकामी होत गेला.

मृत्यूनंतर सुवासिनीप्रमाणे सजवून आपली अंत्ययात्रा काढावी, अशी इच्छा त्यांनी मेक अप आर्टिस्ट दीपक सावंतकडे व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार स्मिता यांचं पार्थिव सुवासिनीप्रमाणे सजवून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments