कॉमेडियन कपिल शर्मा सध्या टेलिव्हिजनपासून दूर आहे. पण मोठ्या पडद्यावर येण्याची त्याची तयारी जोरात सुरू आहे. होय, कपिल शर्माचा दुसरा चित्रपट ‘फिरंगी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले. चित्रपटाच्या शीर्षकावरून हा चित्रपट इंग्रजांच्या कुठल्याशा मुद्यावर आधारित असल्याचे कळते. या चित्रपटात कपिलने हिंदीला महत्त्व देत, इंग्रजी भाषेचा धुव्वा उडवला आहे. पोस्टरमध्येही हेच दिसतेय. कपिल शर्मा कुठल्याशा इंग्रजाला लाथ मारून पिळावून लावताना यात दिसतोय. चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीची कथा आहे, असे हे पोस्टर सांगते. पण सूत्रांच्या मते, यात प्रेमाचा एक कोणही आहे. कपिल शर्मा एका देशी मुलीच्या प्रेमात पडतो. पण ही मुलगी पुढे इंग्रजी भाषेच्या प्रेमात पडते. आपले प्रेम मिळवण्याच्या नादात कपिल इंग्रजी राजवटीविरोधात मैदानात उतरतो, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे कळतेय. या चित्रपटात दोन नायिका आहेत. एक तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता आणि दुसरी मोनिका गिल. दोघीही लीड भूमिकेत आहे. कपिलचा ‘जिगरी यार’ राजीव धिंगरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. आत्तापर्यंत राजीवने ‘लव पंजाब’ आणि ‘अंग्रेज’ हे दोन हिट सिनेमे दिले आहेत.