मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर केलेली कमेंट सहपरीक्षक मल्लिका दुआला रुचलेली नाही. अक्षयच्या मुलीला कोणी ‘तशा’ प्रकारे कमेंट केली तर त्याला रुचेल का? असा सवाल तिने केला.
मोठ्या सेलिब्रेटींना ‘चार्म’ आणि ‘हार्म’ मधला फरक कळत नाही, असं म्हणत मल्लिकाने संताप व्यक्त केला आहे. अक्षय हे फक्त उदाहरण आहे, पण इतर अनेक सेलिब्रेटींना याचं भान नसल्याचं मल्लिका म्हणाली. जे-जे सेलिब्रेटींना आपल्या महिला सहकाऱ्याला तिच्या संमतीविना कवटाळतात, त्यांना हा सवाल असल्याचं ती म्हणाली. मल्लिकाने एक खुलं पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘अक्षय कुमारच्या मुलीला कोणी मजेत म्हटलं, नितारा जी, आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू’ तर त्याच्या पचनी पडेल का?’ असं मल्लिकाने ठामपणे विचारलं आहे.
‘महिला असो वा पुरुष. हेतूपुरस्पर किंवा चुकून. कामाच्या ठिकाणी एटिकेट्स न पाळणाऱ्या सर्वांसाठी हे आहे. तुमच्यामुळे एखाद्याला कामाच्या ठिकाणी अवघडल्यासारखं होता कामा नये. प्रोफेशनल कम्युनिकेशनचं भान प्रत्येकानं बाळगावं’ असं मल्लिका दुआ म्हणते. ‘मल्लिकाजी आप बेल बजाईये, मै आपकी बजाता हू’ असं अक्षय कॉमेडी शोच्या सेटवर म्हणाला होता. हा भाग चॅनेलने प्रक्षेपित केला नाही, मात्र अक्षयच्या टिपणीचं वृत्त सोशल मीडियवर पसरलं आणि मल्लिका दुआसह तिचे चाहतेही नाराज झाले.
‘बेल वाजवणं’ हा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मध्ये स्पर्धकाचं कौतुक करण्याचा प्रकार आहे. सुपरजज अक्षयने जज मल्लिकाला स्पर्धकाचं कौतुक करण्यास सांगताना ही कमेंट केली. मल्लिका प्रमाणेच तिचे वडील, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआही संतापले आहेत. त्यांनी फेसबुकवर आपला राग व्यक्त केला आहे.