मुंबई:‘अधिकारी ब्रदर्स’चे महत्त्वाचे आधारस्तंभ असणाऱ्या गौतम अधिकारी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, त्यांच्या जाण्याने अधिकारी कुटुंबावर शोककळा पसरली. अधिकारी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असे कुटुंब आहे. ‘अधिकारी ब्रदर्स’सोबतच ‘सब टीव्ही’चे संस्थापक म्हणूनही त्यांची ओळख होती.
भाऊ मार्कंड अधिकारी यांच्या साथीने गौतम अधिकारी यांनी या वाहिनीची सुरुवात केली होती. आज या वाहिनीची लोकप्रियता प्रचंड वाढली. टेलिव्हिजन विश्वात अधिकारी यांच्या नावाला प्रचंड वजन प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने छोट्या पडद्यावरील विश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. मालिका विश्वात अधिकारी यांनी एक विक्रमही प्रस्थापित केला होता. एकाच मालिकेच्या सर्वाधिक भागांचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक’मध्येही करण्यात आली होती.