मुंबई: बिग बॉस- ११ मध्ये भांडणं आणि मारामारी व्यतिरिक्त घरात बऱ्याच वेगळ्या गोष्टीही सुरू आहेत. पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा यांची जोडी त्यांच्या रोमान्समुळे सध्या भलतीच चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात सलमान खानने त्यांना घरात वावरताना तारतम्य बाळगून वावरण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. पण एवढ्या सूचनांनंतरही दोघांच्या वर्तणूकीत फारसा फरक पडला नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्या वडिलांच्या तब्येतीवर झाला. उच्च रक्तदाबामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व गोष्टी कमी की काय मुंबईतील घर मालकानेही बंदगीला घर सोडण्यास सांगितले आहे.
घरातील सदस्यांनी पुनीश आणि बंदगी यांना एकत्र बाथरूममध्ये जाताना पाहिले. त्यांच्या या कृत्यामुळे घरात नव्याने चर्चा सुरू झाल्या. आता या ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमान त्यांची कशी कानउघडणी करणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल. याआधीही पुनीश आणि बंदगी यांचा एक किसिंग व्हिडिओ समोर आला होता.
पुनीशमुळे बंदगीचा प्रियकर डेनिस नागपाल याने बंदगीसोबतचे नाते तोडले आहे. डेनिस हा बिग बॉसचा कास्टिंग डायरेक्टर आहे. या दोघांच्या या वर्तणुकीमुळे डेनिसने ब्रेकअप केल्याचे म्हटले जात आहे. या दोघांच्या अशा वागण्यामुळे घरातील सदस्यही त्रस्त आहेत. सलमानने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, ‘प्रेमावर कोणाचेच नियंत्रण नसते. पण आपला हा शो कौटुंबिक आहे. आई- बाबाही हा शो पाहत आहेत. तुम्ही जे काही करत आहात ते सर्व तुम्ही तुमच्या घरातल्यांसमोर करत असाल तर ठीक आहे. पण तुम्ही तसे करत नसाल तर इथेही करु नका.’