Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमनोरंजन‘मी आणि परवीन चार वर्षे एकत्र होतो’

‘मी आणि परवीन चार वर्षे एकत्र होतो’

विविध रुपात प्रेमाची संकल्पना मांडणाऱ्या या चित्रपटसृष्टीत अशाच एका प्रेमी जोडप्याने एकेकाळी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. ते जोडपं म्हणजे डॅनी डॅन्झोपा आणि परवीन बाबी. आपल्या मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत डॅनी जवळपास चार वर्षे एकत्र राहात होते.

‘फिल्मफेअर’ने त्यांच्या एका मुलाखतीतील भाग प्रसिद्ध केला असून, या जुन्या मुलाखतीत त्यांनी परवीन बाबी यांच्याबद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला होता. परवीनसोबतच्या नात्याविषयी सांगताना डॅनी म्हणाले होते, ‘त्यावेळी आम्ही तरुण होतो. समजुतदार होतो. जवळपास चार वर्षे आम्ही एकत्र राहिलो. मुख्य म्हणजे त्यावेळी संपूर्ण चित्रपटसृष्टीत आमच्या नात्याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतरच्या काळात आमच्या नात्यात दुरावा आला खरा पण, तरीही आमची मैत्री मात्र कायम टिकून राहिली.’ माझ्यापासून दुरावल्यानंतर परवीन कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण, त्यावेळीसुद्धा ती मला घरी जेवणासाठी बोलवायची, असंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. त्यावेळी डॅनी यांच्या आयुष्यातही प्रेम परतलं होतं. ते अभिनेत्री किमला डेट करत होते. पण, परवीनच्या वागण्यामुळे त्यांच्या आणि किमच्या नात्यात बराच तणाव निर्माण झाला होता. परवीन माझ्या घरी येऊन अगदी मोकळेपणाने घरात वावरत होती. पण, त्यावेळी माझ्या प्रेयसीला तिचे हे वागणे मुळीच पटत नव्हते, असे डॅनी यांनी त्या मुलाखतीत स्पष्ट केले होते. पण, आपण तर फक्त मित्रच आहोत, असे म्हणत परवीनने नेहमीच ही गोष्ट टाळली. परवीन बाबींच्या वागण्यात होणारे बदल त्यावेळी डॅनी यांच्यापासून लपलेले नव्हते. ती आजारी असताना महेश भट्ट यांनी आपल्याला त्याविषयीची माहिती देऊन तिला आधार देण्यासाठी तू यावस असं म्हटल्याचं डॅनी यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. परवीनला जेव्हा जेव्हा माझी गरज होती, तेव्हा तेव्हा मी तिच्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो होतो, अशी आठवणही त्यांनी जागवली. डॅनी आणि परवीन यांचं नातं संपून बरीच वर्षे उलटली होती. त्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या होत्या. पण, नात्यातील बंध अद्यापही कायम होता. परवीन यांच्या अंत्ययात्रेच्या वेळीसुद्धा डॅनी यांची उपस्थिती होती. एकेकाळी ज्या अभिनेत्रीला आपल्या चित्रपटासाठी साईन करण्याकरिता निर्माते, दिग्दर्शकांची रांग लागायची, तिच्या शेवटच्या क्षणांमध्ये मात्र कबीर बेदी, महेश भट्ट, जॉनी बक्शी, रंजीत आणि ‘काला सोना’चे निर्माते हरिश शाह अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच मंडळींची उपस्थिती होती. ती परिस्थिती कितीही कटू असली तरीही हेच खरं होतं, अशी खंतही डॅनी यांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments