Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनझायरा वसीम प्रकरणी आरोपीला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

झायरा वसीम प्रकरणी आरोपीला २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री झायरा वासीम हिच्याशी विमान प्रवासादरम्यान गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संशयित आरोपीने जामीनासाठी अर्ज केला असून, आरोपीच्या जामीन अर्जावर १५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

Vikas Sachdev

धाकड गर्ल आणि काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीम हिने विमानामध्ये एका प्रवाशाने असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणी विकास सचदेव या व्यक्तीला सहार पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत त्याला  पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपल्यावर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, आरोपी विकासच्या पत्नीने प्रसारमाध्यमांसमोर येत विकासचा झायराला चुकून धक्का लागला होता, असे त्यांनी म्हटले होते. विमानातून उतरण्यापूर्वी झायराची विकासने माफी देखील मागितली होती आणि तिने त्यावेळी माफी स्वीकारली देखील होती असे विकासच्या पत्नीने म्हटले होते.
हे आहे प्रकरण. झायरा वसीमनं आपल्या इन्स्टाग्रामवर विमानातील छेडछाडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता.  झायरा वसीम शनिवारी दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. तिने बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘१ एफ’ सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘२ एफ’ वर ४५ वर्षांचा एक इसम बसलेला होता. नऊ वाजून २० मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराच्या मान व पाठीला स्पर्श केला. त्याबाबत सांगूनही दुर्लक्ष करत राहिल्याने अखेर ती घाबरून किंचाळली. मात्र कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने या प्रकाराचे मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करीत असताना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती १७ वर्षीय झायराने स्वत: विमानातून उतरल्यानंतर मध्यरात्री ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केली. ती घटना सांगताना तिला अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर जगभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित प्रवाशाविरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती.  जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह राजकीय, सामाजिक व बॉलिवूडमधील विविध मान्यवरांनी याबाबत सोशल मीडियावरुन निषेध नोंदवत संबंधित विकृत प्रवाशावर कठोर कारवाईची मागणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments