शक्ती कपूर यांनी विविध चित्रपटांमध्ये आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांपासून ते अगदी विनोदी भूमिकांपर्यंत प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांसमोर जीवंत करणारे शक्ती कपूर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांची ही भूमिका जितकी वेगळी आहे तितकीच आव्हानात्मकही आहे. आगामी ‘रक्तधार’ या चित्रपटातून ते तृतीतपंथीयाची भूमिका साकारत असून, या भूमिकेद्वारे एका महत्त्वाच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
तृतीयपंथीयाची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारण्याच्या अनुभवाविषयी सांगताना शक्ती यांनी एक इच्छाही व्यक्त केली. तृतीयपंथी समुदायाला एक दिवस समान वागणूक मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. समाजातील एक अविभाज्य घटक म्हणून तृतीयपंथीयांकडे पाहिलं जातं पण, बऱ्याच ठिकाणी त्यांना समान हक्कांपासून वंचित राहावं लागतं. त्यांना इतरांप्रमाणेच सर्व हक्क मिळावेत यासाठी बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातूनही या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘रक्तधार’सुद्धा त्याच यादीतील एक चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही.
आपल्या या आगामी चित्रपटाविषयीची माहिती देत शक्ती कपूर म्हणाले, “बऱ्याच लहान गोष्टी मोठे आणि महत्त्वाचे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. ‘रक्तधार’ हे त्याचच उदाहरण आहे. हा बिग बजेट चित्रपट नसला तरीही त्याद्वारे जो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याचा प्रेक्षक मोठ्या मनाने स्वीकार करतील आणि तृतीयपंथीयांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनातही बदल करतील अशी मला आशा आहे.”