नवी दिल्ली: पुण्यातील राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आलीय. ते FTII चे नवे अध्यक्ष असणार आहेत. यापूर्वीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या जागी अमुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आलीय. खरंतर अडीच महिन्यांपूर्वीच गजेंद्र चौव्हाण यांचा कार्यकाल संपला होता. तेव्हापासून एफटीआयआयचं अध्यक्षपद हे तशाअर्थाने रिकामेच होते.
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध करत सलग १३९ दिवस धरणे आंदोलन केलं होतं. पण तरिही केंद्र सरकार चौहान यांच्या नियुक्तीवर ठाम राहिलं. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे गजेंद्र चौहानही एफटीआयआयकडे फारसे फिरकले नाही. त्यामुळे आता अमुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर तरी तिथला विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय का हे पाहावं लागणार आहे.
खरंतर अनुपम खेर हे उत्तम अभिनेते असून त्यांनी आतापर्यंत ५०० चित्रपटांमधून विविधढंगी भूमिकाही साकारल्यात. पण केंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून ते जाहीरपणे सरकारच्या भूमिकांचं समर्थन करत होते. वेळप्रसंगी मोदी विरोधकांना अंगावरही घेत होते. कदाचित त्याचेच फळ म्हणून अमुपम खेर यांना ‘एफटीआयआय’चं अध्यक्षपद दिलं गेल्याचा आरोप होतोय. अर्थात अनूपम खेर यांनी नि:पक्ष पद्धतीने एफटीआयआयचा कारभार हाकला तर विरोधकांचा हा आरोप खोटाही ठरू शकतो. कारण एफटीआयआय या फिल्म संस्थेला नसरुद्दीन शहा, जया बच्चन, स्मिता पाटील, श्याम बेगेनल अशा दिग्गज कलाकारांची परंपरा आहे.