मुंबई – बायोपिक म्हणजेच चरित्रपटांचा ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत आहे. विविध खेळाडूंपासून ते उल्लेखनीय व्यक्तींपर्यंत अनेकांचेच बायोपिक साकारण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकरपासून ते अगदी सायना नेहवाल यांच्या आयुष्यावर चित्रपट साकारण्यासाठी बऱ्याच जणांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यातले बहुतेक बायोपिक हे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले.
आता अजून एक व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध असलेले जेष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ‘नो वन किल्ड जेसिका’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता जेठमलानी यांच्यावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बिग बी अमिताभ बच्चन जेठमलानी यांची भूमिका साकारणार असल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलं आहे. सुझेन अॅडेलमन यांनी जेठमलानी यांच्यावर लिहिलेल्या ‘द रिबेल’ या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करणार आहेत.एकीकडे बिग बींना जेठमलानी यांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं असून तरुणपणीचे जेठमलानी कोण साकारणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.