काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. या मालिकेत ती साकारत असलेली गौरी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी गौरी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. पण तिला या मालिकेने खरी लोकप्रियता मिळवून दिली.
सायली नुकतीच लंडनला रवाना झाली असून तिनेच ही बातमी इन्स्टाग्राम द्वारे तिच्या फॅन्सना सांगितली आहे.
तिने तिचा विमानतळावरील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून त्याचसोबत लंडन, शुट, अॅक्टर्स लाइफ, सरप्राईज, कमिंग सून असे हॅश टॅग दिले आहेत. काहे दिया परदेस ही मालिका संपल्यानंतर सायली चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा कित्येक दिवसांपासून सुरू आहे. आता ती तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना देखील झाली आहे. या चित्रपटात तिच्या सोबत दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशी देखील असणार असल्याचे कळतेय. सुव्रतदेखील लंडनला रवाना झाला आहे. सुव्रत आणि सायलीच्या चित्रपटाचे नाव काय आहे, या चित्रपटात त्यांच्या भूमिका काय असणार आहे याबाबत प्रेक्षकांना काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.
सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता. तिला स्वतःला पॉलिटिकल सायन्समध्ये प्रचंड रस होता. तिला पॉलिटिकल अॅनालिसिस्ट बनायचे होते. पण कॉलेजमध्ये असताना एका एकांकिकेत तिने काम केले होते. त्या एकांकिकेसाठी तिला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. त्या एकांकिकेला प्रवीण तरडे परीक्षक म्हणून आले होते. तू स्क्रिनवर छान दिसशील, ऑडिशन्स दे असे ते तिला म्हणाले आणि या एकांकिकेमुळे तिचा अभिनयप्रवास सुरू झाला. तिने सुरुवातीच्या काळात काही जाहिरातींमध्ये काम केले. प्रियांका चोप्रासोबतदेखील ती एका जाहिरातीमध्ये झळकली होती. त्यानंतर तिने पोलिसलाइन या चित्रपटात काम केले आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.