कंगना राणौत सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा हृतिकसोबत सुरू असलेल्या भांडणांमुळे जास्त चर्चेत आहे. हृतिक आणि तिचे अफेअर असल्याचा दावा तिने आप की अदालत या कार्यक्रमात केला होता. हृतिक आणि तिच्यात अनेकवेळा मेलद्वारे बोलणे व्हायचे असे तिने म्हटले आहे. याच मेलमधील काही मेल सध्या मीडियाच्या हाती लागले आहेत. पण मी कंगनासोबत मेलद्वारे कधीच संपर्क साधला नसल्याचे हृतिकने म्हटले आहे.
कंगनाच्या एका मेलमध्ये आता बॉलिवूडच्या एका सुपरस्टारचा देखील उल्लेख करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. हा बॉलिवूडचा सुपरस्टार दुसरा कोणीही नसून सलमान खान आहे. सलमान खान आणि उदय चोप्रा या दोन अभिनेत्यांचा कंगनाने तिच्या मेलमध्ये उल्लेख केला आहे. तिने मेलमध्ये म्हटले आहे की, सलमानने तिला चित्रपटात काम करण्यासाठी विचारले होते. पण तिने चित्रपटासाठी नकार दिल्यावर सलमानने तिला अपशब्द वापरायला सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर नर्गिस फाकरी आणि उदय चोप्रा यांच्या नात्याविषयी देखील या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
या मेलमध्ये लिहिण्यात आले आहे की, तू बिग बॉसमध्ये तुझ्या चित्रपटाचे प्रमोशन करायला गेलास हे खूपच चांगले होते. पण तू एस के (सलमान खान)ला भेटला नाहीस हे अतिशय चांगले झाले. तो खूप विचित्र आहे. त्याने मला एका चित्रपटासाठी विचारले होते. त्यावेळी तो मला म्हणाला होता की, मला ऑफर करण्यात आलेला चित्रपट करिना करत आहे. पण हा चित्रपट मी तुला देऊ शकतो. या चित्रपटाने तुझे करियर बनेन. मी त्यावर त्याला काहीच बोलली नाही.
तो वेडा आहे असे मला क्षणभर वाटले. करिनाच्या बजंगरी भाईजान या चित्रपटातील भूमिकेने माझे करियर बनणार होते? तो कोणत्या जगात राहतो? त्याच्या कोणत्या नायिकेचे करियर त्याने बनवले. मी त्याच्यासोबत काम न केले हे चांगलेच झाले असे अनेकांना वाटते. कारण त्यामुळे माझ्या ब्रँडला धक्का लागला असता. एकदा तो मला बोलला होता की, तू येवढी अभिनयाच्या मागे का धावतेस… कतरिनाकडे बघ. ती छान दिसते. पण ती चित्रपटांत तिचे तोंड जास्तीत जास्त काळ बंद ठेवते. मी त्याला बोलली होती. तू आजही १९व्या शतकात आहे. मला कतरिना किंवा सलमान बनायचेच नाहीये. त्यावर त्याने मला अपशब्द वापरायला सुरुवात केले होते. त्यानंतर मी त्याच्याशी बोलणेच बंद केले. क्वीननंतर मला भेटायचे त्याने अनेक प्रयत्न केले. पण त्याला भेटायची मला इच्छाच नव्हती.
मी नुकतीच मिसमालिनीला ही बातमी वाचली की, तू नर्गिस आणि उदयसोबत फिरत होतास. तू नर्गिसला ट्विटरवर अटेन्शन देत आहे हे पाहून उदयला नक्कीच दुःख झाले असेल. पण तू सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित समजून सांगितल्यास. त्याचा मला अभिमान आहे.