सलमान खान स्टारर ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाला मिळालेलं अपयश पचवत दिग्दर्शक कबीर खान आता त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. १९८३ मध्ये पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित चित्रपट तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग भारतीय संघाचं तत्कालीन नेतृत्त्व करणाऱ्या कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. आता या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी बी- टाऊनमधील एका अभिनेत्रीचं नाव पुढे येत आहे.
रणवीरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी कबीरने त्याच्या टीमचाच एक भाग असलेल्या कतरिना कैफच्या नावाला प्राधान्य दिलं आहे. कबीरसोबत काम करण्याचा अनुभव असल्यामुळे कतरिनासुद्धा या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्सुक असल्याचं वृत्त ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलं आहे. कपिल देव यांच्या पत्नीच्या म्हणजेच रोमी देव यांच्या भूमिकेसाठी तिच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं आहे.
कबीर खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तिने याबद्दलची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, या चित्रपटासाठी दोन अभिनेत्रींची निवड करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात असून, त्यात एका नव्या चेहऱ्यालाही संधी मिळू शकण्याची चिन्हं आहेत. कतरिना आणि रणवीर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले तर प्रेक्षकांना एका नव्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येईल.