
नागपूर: भाजपा व शिवसेना या मित्र पक्षात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. भाजपने मुख्यमंत्रीद शिवसेनेला देता येणार नाही हा हट्ट सोडला नाही त्यामुळे शिवसेने भाजपशी फारकत घेतली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या दोन्ही पक्षांना अप्रत्यक्षरित्या सुनावले असल्याचे दिसत आहे. आपसात भांडल्याने दोघांचंही नुकसान होतं, हे माहिती असुनही काहीजण भांडतात” असेही त्यांनी नमूद केले आहे.
मोहन भागवत नागपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. “स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणं अद्यापही बंद झालेली नाहीत,” असं देखील सरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे निकालानंतर शिवसेना भाजपात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवर या दोघांनीही भागवतांशी भेट घेतली होती. त्यामुळे भागवत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना समजवन्याचा प्रयत्न करतील अशीही चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीचं झालं नाही. उलट शिवसेना आक्रमक झाली असून भाजपने शिवसेनेला एनडीएमधून काढल्याची घोषणाही करुन टाकली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये आणखीनच ताण वाढला आहे.