भंडारा: महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या विनयभंग प्रकरणी भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. वाघमारे यांना न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, 16 सप्टेंबरला तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. यावेळी आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. या प्रकरणी संबंधित महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरुन विनयभंगासह कलम 353, 354, 472, 504, 506, 34 अंतर्गत 18 सप्टेंबर रोजी तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले होते.
अखेर शनिवारी सकाळी तपास अधिकारी आमदार वाघमारे यांच्या खात रोडवरील निवासस्थानी पोहचले. त्यांनी वाघमारेंना ताब्यात घेऊन भंडारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. दुपारी तीनच्या सुमारास वाघमारेंना न्यायालयात हजर करण्यात आलं. समर्थकांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार वाघमारे यांनी थांबवत जामीन घेण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांची रवानगी भंडारा कारागृहात केली.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रकरण घडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.